विभागांच्या कामाचा महापौर आजीव पाटील यांनी घेतला आढावा
महापौरांचा विकासाचा अजेंडा
विभागांच्या कामाचा महापौर अजीव पाटील यांनी घेतला आढावा
समस्या तातडीने निकाली काढण्याचे प्रशासनाला निर्देश
वसई, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात मंगळवारी महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय पातळीवरील अडचणी यावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्रभागातील समस्या तातडीने निकाली काढून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या स्पष्ट सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रशासकीय राजवटीत करण्यात आलेली कामे, रखडलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती या वेळी सादर करण्यात आली. जनतेची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्यावर महापौरांनी भर दिला. शहराचा सर्वांगीण विकास साधताना सर्वसामान्य नागरिक, बागायतदार, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, असे महापौर अजीव पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प, दिव्यांग व संविधान पार्क, नारिंगी-पापडखिंड येथील प्रस्तावित बर्ड पार्क, जीवदानी मंदिर परिसरातील क्रिकेट मैदानाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रूपांतर तसेच २०१५ पासून प्रलंबित रिंगरूट आणि उड्डाणपुलांच्या कामांबाबत आढावा घेण्यात आला. रेल्वे स्थानक परिसरातील १०० मीटर क्षेत्र फेरीवालामुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने वसई-आचोळे येथील ४०० खाटांचे रुग्णालय आणि नालासोपारा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पाणीपुरवठा, परिवहन, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणासाठीही विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. बैठकीनंतर महापालिकेतील स्वच्छतादूतांना स्मार्ट वॉचचे वितरण करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
या बैठकीला माजी महापौर प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत, नगरसेवक प्रफुल्ल साने, विविध विभागांचे उपायुक्त, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
विकासकामांना गती
उड्डाणपूल, रिंगरूट, एमएमआरडीएअंतर्गत रस्ते, बर्ड पार्क तसेच संविधान पार्कसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले असून, ते तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश महापौर अजीव पाटील यांनी दिले. शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या विकासकामांना येत्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामांतील दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून, वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या स्वच्छतादूतांना स्मार्ट वॉचचे वितरण करून त्यांच्या योगदानाबद्दल महापौर अजीव पाटील यांनी विशेष कौतुक केले.
------------
वसई : आढावा बैठकीत महापौर अजीव पाटील, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व अन्य अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

