ठाणे स्थानकावर सोहमला श्रद्धांजली

ठाणे स्थानकावर सोहमला श्रद्धांजली

Published on

ठाणे स्थानकावर सोहमला श्रद्धांजली
मुंबई रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
सकाळ वृतसेवा
ठाणे, ता. ११ : परीक्षेच्या पहिल्या दिवशी पेपर देण्यासाठी निघालेला १२वीचा विद्यार्थी सोहम याचा मंगळवारी लोकल ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे झालेल्या अतिगर्दीत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अत्यंत तुटपुंज्या उपस्थितीत श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. मात्र, या वेदनादायी घटनेनंतरही रेल्वे सुरक्षेचा प्रश्न कायमच अनुत्तरित राहिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मुंबई उपनगरी रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. सकाळी घरातून हसत-खेळत निघालेला प्रवासी संध्याकाळी सुरक्षित परत येईल याची शाश्वती नसल्याने अनेक कुटुंबे दिवसभर चिंतेत असतात. वाढती गर्दी, अपुरी गाड्यांची संख्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि रखडलेले प्रकल्प यामुळे अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही.

रेल्वे अपघातांच्या घटनांनंतर जबाबदारी निश्चित होत नसल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनांनंतरही स्पष्ट ‘भूमिका आणि जबाबदाऱ्या’ निश्चित न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अपघातांची चौकशी होते, पण दीर्घकालीन उपाययोजना मात्र कागदावरच राहतात, अशी टीका या वेळी करण्यात आली. याप्रसंगी मुंबई रेल प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था अध्यक्ष नंदकुमार देशमुख आदी उपस्थित होती.

मुंबईसाठी स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना उपनगरी रेल्वेचे प्रमुख निर्णय दिल्लीतील अधिकाऱ्यांकडून घेतले जातात, याबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. कळवा–ऐरोली लिंक, अतिरिक्त ५-६ ट्रॅक, १५ डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी विस्तारित प्लॅटफॉर्म, तसेच इतर प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी होत आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते, असे मत प्रवासी संघटनांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com