एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ
Published on

एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ
सवलतधारकांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ अनिवार्य
पालघर, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात आता डिजिटल परिवर्तनाची ठळक पायरी टाकण्यात आली आहे. रोख व्यवहारांना पर्याय देत प्रवास अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारा आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही बाबी एकाच कार्डद्वारे शक्य होणार आहेत. यामुळे तिकीट व्यवहारांतील गैरप्रकारांना आळा बसेल, तसेच प्रवाशांना अधिक वेगवान व सोयीस्कर सेवा मिळेल.
या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच राज्यभरातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बस स्थानकांवरच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

चौकट
कोणाला मिळणार ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’?
या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयांमार्फत कार्डचे वितरण करण्यात येईल.

बॉक्स
कार्डची वैशिष्ट्ये : प्रवासात स्मार्ट सोय
नवीन ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ ची किंमत जीएसटीसह १९९ रुपये असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ते १४९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. कार्डमध्ये किमान १०० रुपयांची वॉलेट मर्यादा असून, ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. ईटीआयएम मशिन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप किंवा नियुक्त एजंटकडून रिचार्जची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ३,००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com