

उच्चदाब वाहिन्यांचा धोका
योगीधाम परिसरात रहिवाशांचा जीव टांगणीला!
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातून जाणाऱ्या उच्चदाब विद्युतवाहिन्या, नदीपात्रात झालेला अनधिकृत भराव आणि धोक्याच्या छायेत उभे राहिलेले निवासी प्रकल्प यामुळे सार्वजनिक जीवितहानीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या कल्याण शहर उपाध्यक्ष पुष्पा रत्नपारखी यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका) आयुक्तांना पत्र देऊन तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
योगीधाम-शहाड परिसरातून जाणारी ही ट्रान्समिशन लाइन अत्यंत उच्च क्षमतेची असून, याच लाइनद्वारे रेल्वे सेवेला वीजपुरवठा केला जातो. पत्रात नमूद केल्यानुसार पूर्वी हे टॉवर सुरक्षित उंचीवर होते. मात्र, वालधुनी नदीपात्रात बेकायदेशीररीत्या प्रचंड भराव केल्यामुळे जमिनीची पातळी वाढली आहे. परिणामी, उच्चदाब वाहिन्या आणि जमीन यातील अंतर अवघे २० ते २५ फूट उरले आहे. या महाकाय वाहिन्या निवासी इमारतींच्या अगदी जवळून जात आहेत, ज्यामुळे रहिवाशांच्या डोक्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार आहे.
सर्व निवासी प्रकल्प महापालिकेने मंजूर केलेले आहेत. नदीची ‘हाय फ्लड लेव्हल’ माहीत असतानाही पात्रात भराव करून हे प्रकल्प कसे उभे राहिले, असा सवाल रत्नपारखी यांनी उपस्थित केला आहे. पालिकेने अधिकृत परवानगी दिल्यामुळेच नागरिकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी लावून येथे सदनिका खरेदी केल्या. मात्र, आता इमारतींच्या पायापर्यंत नदीचे पाणी पोहोचत असून, इमारती कमकुवत होत आहेत. ही केवळ विकासातील चूक नसून महापालिकेच्या निष्काळजीमुळे झालेली नागरिकांची मोठी फसवणूक आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कायद्याचे उल्लंघन
सद्यःस्थितीत योगीधाममधील नागरिक सतत मानसिक तणावात आणि जीव मुठीत घेऊन जगत आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, पर्यावरण संरक्षण आणि सीआरझेड नियम कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे पत्रात नमूद केले आहे."ही एक मानवनिर्मित आपत्ती आहे. पावसाळ्यात पूरसदृश्य स्थितीत हा धोका अधिकच वाढतो. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागृत होऊन यावर कठोर कारवाई करावी," अशी मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.