वाहतूक कोंडीवर रिव्हर्स लेनचा उतारा

वाहतूक कोंडीवर रिव्हर्स लेनचा उतारा

Published on

वाहतूक कोंडीवर रिव्हर्स लेनचा उतारा
वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवी अंमलबजावणी; वाहतूक पोलिसांचा निर्णय

ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : पूर्व द्रुतगती महामार्गावरील पिक अव्हर्समधील वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या महामार्गावर सुरू असलेल्या उन्नत मार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडीत पडणारी भर लक्षात घेता, ठाणे वाहतूक विभागाने ही कोंडी फोडण्यासाठी घेतलेल्या रिव्हर्स लेनच्या निर्णयाने सकाळी मुंबईला जाणाऱ्या आणि सायंकाळी मुंबईवरून ठाण्यात येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. रिव्हर्स लेनच्या निर्णयामुळे वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होत आहे.

ठाणे मुंबईला जोडणारा पूर्व द्रुतगती महामार्ग नाशिक, गुजरात आणि दिल्लीला जाणारा महत्त्वाचा दुवा आहे. या महामार्गावरून रोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वाहतूक सुरू असते. चारपदरी हा महामार्ग रात्रंदिवस वाहनांनी गजबजलेला असतो. त्यामुळे कसाऱ्यापासून कल्याण, उल्हासनगर, टिटवाळा, शहाड, ठाणे या शहरांमधील नागरिक कामासाठी सकाळी मुंबईकडे जात असतात. त्यामुळे आनंदनगर येथील टोलनाका परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. हीच अवस्था सायंकाळी मुंबईहून परतणाऱ्या वाहनचालकांची असते. या कोंडीमुळे कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूर्व द्रुतगती महामार्ग परिसरात असलेल्या हरिओमनगर, आनंदनगर कोपरी येथील वाहनचालकांना या कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. त्यांना रस्ता ओलांडणे कठीण जाते. यावर ठाणे वाहतूक विभागाने पिक अव्हर्सच्या वेळेत परिसरातील कोंडी फोडण्यासाठी उपाय रिव्हर्स लेनचा उपाय शोधला आहे. शिवाय या वेळेत घोडबंदर, कल्याण तसेच शहरातील विविध भागांतून येणाऱ्या वाहनचालकांचीदेखील कोंडीतून सुटका होण्यास मदत होत असल्याचे कोपरी उप वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली. तर उन्हातान्हात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या प्रयत्नांमुळेच ही कोंडी नियंत्रणात येत असल्याचे समाधान विवेक सबनीस नामक ठाणेकराने व्यक्त केले.

-------
चौकट
वाहनचालकांना दिलासा
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशाने सकाळी ७ ते ९ या अत्यंत गर्दीच्या वेळेत ‘रिव्हर्स लेन’ सुरू करण्यात आली आहे. या उपाययोजनेत विरुद्ध दिशेची एक लेन वाहनांची गर्दी असलेल्या लेनला जोडून ती कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे या प्रयोगाला यशदेखील मिळत आहे. अवघ्या दोन तासांसाठीच्या या बदलाने सकाळ, संध्याकाळ होणारी कोंडी नियंत्रणात आली आहे. या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनाही त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
---

सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत मुंबई आणि ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. ही संख्या अवघ्या दोन-तीन तासांसाठी असली तरी तिचे नियोजन करणे फार गरजेचे ठरते. परिस्थितीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामदेखील दिसू लागले आहेत.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com