परीक्षेच्या काळात रेल्वेमध्ये राखीव डब्याची बालकलाकाराची मागणी
परीक्षार्थ्यांसाठी राखीव डबा असावा
बालकलाकाराची रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार) : बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत राहणाऱ्या विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या घटनेने व्यथित झालेल्या ठाण्यातील बालकलाकाराने केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांकरिता लोकल रेल्वेमध्ये स्वतंत्र विशेष परीक्षा डबा आरक्षित ठेवावा, अशी मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातून रोज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबईत जाण्या-येण्यासाठी रेल्वे प्रवास करावा लागतो. दरम्यान, रेल्वेमधील गर्दी जीवघेणी ठरत आहे. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असल्याने रेल्वेमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती या बालकलाकाराने केली आहे.
ठाण्यातील बालकलाकार अथर्व वगळ याने पत्राद्वारे ही मागणी केली आहे. तो आपल्या पत्रात म्हणतो, की मुंबईत अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून असंख्य विद्यार्थी येथे रेल्वेने जातात. आता हजारो विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची परीक्षा केंद्रेही मुंबईच्या शाळा-महाविद्यालयांत आली आहेत. गर्दीच्या वेळी प्रवास करताना विद्यार्थ्यांची परवड होते. त्याचा फटका डोंबिवलीत राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी बसला. त्यामुळे आता इतर विद्यार्थ्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. रेल्वेमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारत परीक्षेच्या काळापुरता का होईना एक विशेष आरक्षित डबा निर्माण करावा. तसेच यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राकडे पाठपुरावा करावी, अशी मागणी अथर्वने केली आहे.
-----------
अथर्व एक प्रसिद्ध बालकलाकार
मराठी तसेच हिंदी चित्रपट, मालिका, वेब सीरिज व जाहिरात क्षेत्रात काम करणारा अथर्व स्वतः विद्यार्थी असून, तो रोज ठाणे येथून घाटकोपरला एका नामांकित महाविद्यालयात जातो. अथर्वने ‘धर्मवीर’ चित्रपटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाल भूमिका साकारली आहे.
---------------
अथर्वने सुचवलेले उपाय
बोर्ड परीक्षेच्या काळात तिन्ही मार्गांवर विशेष लोकल गाड्या चालवाव्यात.
विद्यार्थ्यांसाठी दररोज एक-दोन रेल्वे डबे राखीव ठेवावेत.
प्रवासी रेल्वेतून पडू नयेत म्हणून मेट्रो रेल्वेसारखे स्वयंचलित दरवाजे लावावेत.
विद्यार्थ्यांच्या राखीव डब्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस तैनात करावेत.
रेल्वे प्रशासनाने योग्य घोषणा व मार्गदर्शन सुनिश्चित करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

