जव्हारमध्ये कामे खोळंबली

जव्हारमध्ये कामे खोळंबली

Published on

जव्हारचे कामकाज ठप्प
पूर्णवेळ तहसीलदारांअभावी महसूल व नागरी सेवांना विलंब

जव्हार, ता. १२ (बातमीदार) : जव्हारच्या तहसीलदार लता धोत्रे या आजारपणामुळे रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे जव्हार तहसीलदारांचा अतिरिक्त पदभार हा मोखाड्याचे तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे जव्हारमधील महसूल व नागरी सेवांना विलंब होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
आजारपणामुळे तहसीलदार लता धोत्रे या २९ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत रजेवर आहेत. त्यांच्या रजेचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे जव्हारचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. दरम्यान, महसूल विभागातील बहुतांश कामासाठी डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता असते. संबंधित डिजिटल स्वाक्षरी हे मूळ तालुक्यातील अधिकृत तहसीलदारांचीच अधिकृत असल्याने अतिरिक्त कार्यभार असलेल्या तालुक्यातील तहसीलदारांची स्वाक्षरी तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खदाण परवानग्या, रॉयल्टी पावत्या, वीटभट्टी परवाने, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र इत्यादी कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः खदाण व्यावसायिकांना रॉयल्टी पावत्या मिळत नसल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, शासनालाही महसुली तोटा सहन करावा लागत आहे.
-----------------------
अधिकृत स्वाक्षरी उपलब्ध करावी
स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रणालीत तांत्रिक बदल करून अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित तालुक्यासाठी अधिकृत स्वाक्षरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
------------
जव्हारला पूर्णवेळ तहसीलदार रुजू होईपर्यंत कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी जव्हार कार्यालयातील अनुभवी नायब तहसीलदार किंवा अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तात्पुरता कार्यभार द्यावा.
- नरेंद्र मुकणे, युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट

Marathi News Esakal
www.esakal.com