टोकराळेतील रिलायन्स यार्न प्रकल्पाला सुरुवात

टोकराळेतील रिलायन्स यार्न प्रकल्पाला सुरुवात

Published on

टोकराळेतील रिलायन्स यार्न प्रकल्पाला सुरुवात

३० किमीच्या वीजवाहिनीसाठी हालचाली सुरू

पालघर, ता. १२ : पालघर तालुक्यातील केळवे रोड-टोकराळे येथे रिलायन्स इंडस्ट्रीजमार्फत उभारण्यात येणाऱ्या रिलायन्स टेक्सटाईल प्रकल्प अर्थात पॉलिस्टर यार्न प्रकल्पाच्या उभारणीच्या दृष्टीने प्राथमिक टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. प्रकल्पाच्या भौतिक आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक विजेसाठीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत ३० किलोमीटर लांबीची वीज ट्रान्समिशन लाईन टाकण्यात येणार आहे.
केळवे रोड टोकराळे परिसरामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीमार्फत ८५० एकर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पासाठी अधिग्रहणाचे काम औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रगतिपथावर आहे. तर कंपनीच्या प्राथमिक टप्प्यातील भौतिक कामांसाठी देखरेख व्हावी म्हणून अलीकडील काळात कंटेनर केबिन आणण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी वीजवाहिनी टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २२० किलो व्हॅटच्या क्षमतेची सुमारे ३० किलोमीटर लांबीची ट्रान्समिशन लाईन टाकण्यासाठी रिलायन्स कंपनीमार्फत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वाहिनीच्या पारेषण योजनेसाठी पूर्वभ्यास व पूर्वसर्वेक्षण झाले असून कामाचे सर्वेक्षण, बांधकाम, स्थापना, तपासणी उभारणी, वाहिनीचे संचालन, देखरेख आणि संबंधित कामे करण्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीची असणार आहे. आरआईएल बोईसर (पीजी) २२० केवी/डीसी लाईन असे योजनेचे नाव आहे.

वीज वाहून नेणाऱ्या या पारेषण योजनेचे संरेखन आराखडे तयार करण्यात आले असून, ते कंपनीच्या मुंबई कार्यालयात अवलोकनासाठी ठेवण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष वैद्यनाथन एन यांनी म्हटले आहे. बोईसरपासून ते केळवा रोडपर्यंत सुमारे २२ गावांमधून ही ट्रान्समिशन लाईन जाणार असून, त्यासाठी नागरिकांकडून निरीक्षणे आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. पालघर तालुक्यातील बेटेगाव, मान, वारांगडे, बोईसर, कांबळगाव, पंचाळी, कल्लाळे, बिरवाडी, उमरोळी, पडघे, नंडोरे, देवखोप, शेलवाली, अंबाडी, वरखुंटी, कमारे, हरणवाडी, माहीम, टोकराळे, केळवे अशा गावांमधून ही पारेषण वाहिनी जाणार आहे.

याआधी या प्रकल्पाला टेक्सटाईल पार्क म्हणून संबोधले जायचे. मात्र या प्रस्तावित प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे कापड उत्पादन होणार नसून, या ठिकाणी धागा रंगकाम किंवा जलप्रदूषित करणारे कोणतेही टप्पे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणून आता या प्रकल्पचे नाव पॉलिस्टर यार्न प्रकल्प करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com