मुंबईतील ६३ टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण
मुंबईतील ६३ टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण
पावसाळ्यापूर्वी कामे संपवण्याचे आयुक्तांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : खड्डेमुक्त मुंबई मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांनी वेग घेतला असून, आतापर्यंत एकूण ६३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. यापुढील सर्व अपूर्ण कामे निश्चित कालमर्यादेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आयुक्त गगराणी बोलत होते. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, काँक्रीटीकरण टप्पा १ अंतर्गत ७७ टक्के, तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के लक्ष्यपूर्ती झाली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत एकूण १,५९४ रस्त्यांचे सुमारे ४३०.६९ किलोमीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले, की रस्ते काँक्रीटीकरणामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होत असली तरी काम सुरू असताना नागरिकांना होणारा त्रास कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करून जो रस्ता खोदला आहे तो ठरावीक वेळेतच पूर्ण करावा तसेच ही कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांना कामाची इत्थंभूत माहिती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी तांत्रिक दर्जाबाबत कडक भूमिका मांडली. रस्त्याचा केवळ पृष्ठभाग चांगला असून चालणार नाही, तर पायापासून प्रत्येक थरामध्ये तांत्रिक निकष, तापमान आणि आर्द्रता यांचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. काम सुरू असताना संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे त्यांनी नमूद केले. आयआयटी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे कामाचा दर्जा उंचावण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
युद्धपातळीवर नियोजन
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आता केवळ ७५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

