प्रवासी महिलेवर रिक्षाचालकाचा चाकूहल्ला
पनवेल (वार्ताहर) : करंजाडे परिसरात एका रिक्षा लुटारुने महिलेवर धारदार चाकूने सपासप वार करून तिला लुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ११) सायंकाळी घडली. या घटनेत गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल शहर पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमनाथ भोईर यांची पत्नी संगीता (वय ३६) या बुधवारी सायंकाळी पनवेल मार्केटमधून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. उरण नाका येथील रिक्षा थांब्यावरून त्या एका रिक्षात बसल्या. रिक्षा करंजाडे आर-४ मधील सत्यम ट्रायडन्ट इमारतीजवळील नाल्याच्या पुलावर आली असताना, चालकाने रिक्षा बंद पडल्याचे सांगून वाहन थांबवले. त्यानंतर रिक्षाला धक्का मारण्याचा बहाणा करून चालक रिक्षाच्या पाठीमागे गेला. त्यानंतर त्याने अचानक संगीता यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्या रिक्षातून खाली उतरून पळू लागल्या असताना, चालकाने पुन्हा त्यांच्यावर वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. यानंतर त्याने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख ७१ हजारांचा ऐवज हिसकावून घेत रिक्षासह चिंचपाडा पुलाच्या दिशेने पलायन केले.

