''निलेश डाईंग'' ला भीषण आग

''निलेश डाईंग'' ला भीषण आग

Published on

भिवंडीत ‘नीलेश डाइंग’ला भीषण आग
तीन मजली इमारत खाक
भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : शहरातील खोका कंपाउंड परिसरातील ‘नीलेश डाइंग’ या धाग्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते, की पाहता पाहता संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण अग्निशमन दलाच्या एकूण पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अग्निशमन जवानांना विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सुमारे पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावरील कच्चा माल आणि महागडी यंत्रसामग्री खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com