

पान ४ करिता
...................
‘सालबर्डी’मध्ये रंगणार धमाल सरपंच-उपसरपंच या नात्याची मेजवानी
कधी जिव्हाळा तर कधी हलकीफुलकी टोलेबाजी यामुळे गावातील वातावरण वेगळ्याच ढंगात रंगते. गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नातेसंबंधात रंगलेली ग्रामीण वातावरणाची झलक असलेली रंगतदार आणि खुमासदार कथा लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘सालबर्डी’ या आगामी मराठी चित्रपटातून गावच्या सत्तेभोवती फिरणारी कथा आणि त्यात घडणारे रंजक प्रसंग उलगडणार आहेत. या चित्रपटात अनुभवी अभिनेते शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर आपल्या खास विनोदी शैलीसाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात ही व्यक्तिरेखा साकारत आहे. दोघांमधील संवादांतील चुरस, एकमेकांवरचे टोमणे आणि गावातील राजकारणातून निर्माण होणाऱ्या घटना कथेला वेगळीच रंगत देणार आहेत. या भूमिकेविषयी शशांक शेंडे यांनी सांगितले, की ‘‘सालबर्डी’ची कथा रहस्यमय असून स्थानिक पातळीवरील राजकारण आणि नातेसंबंधांची झलक यात पाहायला मिळते. ओंकारसोबतचे जुळलेले सूर आणि आमची जुगलबंदी पडद्यावर रंजक ठरेल.’ ओंकार भोजने म्हणाला, की ‘‘उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका अत्यंत रंगतदार आहे आणि शशांक शेंडे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे.’’ नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केले आहे. पूजा सावंत, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी अशी कलाकारांची मोठी फळी या चित्रपटात आहे. येत्या १७ एप्रिलला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
.............
बादशाहच्या नव्या गाण्यावर सोना मोहपात्राची तीव्र प्रतिक्रिया
गायक बादशाह हा आपल्या वेगळ्या शैलीच्या गाण्यांमुळे नेहमीच लक्ष वेधून घेताना दिसतो; मात्र अलीकडेच त्याचे ‘टटेरी’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले आणि त्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. गाण्यातील शब्द आणि चित्रणाबाबत समाजमाध्यमांवर मोठी प्रतिक्रिया उमटली. याच पार्श्वभूमीवर गायिका सोना मोहपात्रा हिनेही आपली तीव्र भावना व्यक्त करत बादशाहला थेट सुनावले. ‘कलाकारांनी समाजाप्रती जबाबदारीने वागावे,’ असे मत तिने मांडले. गायक सोना मोहपात्रा हिने समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात या गाण्यातील महिलांचे चित्रण आणि पुरुषी दर्प दाखवण्याची पद्धत यावर आक्षेप घेतला. महिलांना केवळ आकर्षणाचे साधन म्हणून दाखवणे ही सर्जनशीलता नसून अतिशय सोपी आणि जुनाट पद्धत असल्याचे तिने स्पष्ट केले. हरियानाची ओळख सांगत स्वतःचा अभिमान मिरवणे पुरेसे नसते, त्या भूमीतील स्त्रियांबद्दल आदरही तितकाच महत्त्वाचा असतो, असेही तिने म्हटले. कलाकार समाजाच्या कल्पनाशक्तीवर प्रभाव टाकतात, त्यामुळे स्त्रियांचा मान राखणारी उदाहरणे पुढे यायला हवीत, असा तिचा ठाम संदेश होता. या गाण्यात शाळेचा गणवेश घातलेल्या मुली नाचताना दाखवण्यात आल्या होत्या. तसेच गाण्यातील काही बोल महिलांविषयी आक्षेपार्ह असल्याची भावना व्यक्त होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.