कारखान्यात सुरक्षेचा बोजवारा

कारखान्यात सुरक्षेचा बोजवारा
Published on

कारखान्यात सुरक्षेचा बोजवारा
पाच महिन्यांत पाच कामगारांचा मृत्यू; अपघातांची मालिका सुरूच
रसायन गळती, आग आणि स्फोटांमुळे कामगार व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती
खालापूर, ता. ११ (बातमीदार) : औद्योगिक विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षा नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या पाच महिन्यांत विविध रासायनिक कारखान्यांतील अपघातांमध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला असून, २५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तालुक्यात सध्या सुमारे २८० पेक्षा अधिक कारखाने कार्यरत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी सुरक्षा साधनांचा अभाव, कुशल कामगारांची कमतरता आणि प्रदूषण नियमांचे पालन न होणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकत्याच मंगलम कापूर उत्पादक कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
याशिवाय नारंगी येथील एचपी अ‍ॅडेसिव्ह कारखान्यात लागलेली आग, तसेच होराळे येथील केन कॉस्मेटिक कारखान्यात रसायन गळती होऊन महिला कामगारांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. रसायणी परिसरातही आगीच्या आणि अपघातांच्या घटना घडत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अपघातांनंतर अनेक प्रकरणे दाबली जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. मृत कामगारांच्या कुटुंबांना तुटपुंज्या आर्थिक मदतीवर समाधान मानावे लागत असल्याची तक्रार आहे.

चौकट
सखोल तपासणी आवश्यक
खालापूर तालुक्यातील सुमारे २८६ कारखान्यांमध्ये धोकादायक रसायने हाताळली जातात. त्यामुळे कारखाना निरीक्षकांनी सर्व कारखान्यांची सखोल तपासणी करून आवश्यक परवाने, सुरक्षा यंत्रणा, प्रशिक्षित कामगार आणि प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात आहेत का, याची पडताळणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई केल्यासच अपघातांना आळा बसेल, अशी मागणी स्थानिक नागरिक व कामगारांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com