महाराजस्व शिबिरातून नागरिकांचे समाधान

महाराजस्व शिबिरातून नागरिकांचे समाधान

Published on

महाराजस्व शिबिरातून नागरिकांचे समाधान
शिबिरांमुळे धावपळ थांबली; सेवा थेट गावपातळीवर
पनवेल, ता. १७ (बातमीदार): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पनवेल तहसील प्रशासनाने राबवलेल्या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोरबे महसूल मंडळातील दुसरे शिबिर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाजे येथे शनिवारी (१४ मार्च) उत्साहात पार पडले. या शिबिरामुळे विविध दाखले व महसुली कामांसाठी नागरिकांची होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी केले. महसूल विभागासह विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते.
शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा, ८-अ वाटप, उत्पन्न, रहिवासी, जाती व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, तसेच विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप करण्यात आले. याशिवाय ॲग्रीस्टॅग व पीएम किसान नोंदणी, पानंद रस्ते, सर्वांसाठी घरे पट्टेवाटप यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आली.
भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी २.०, महाभूमी पोर्टल व गावठाण भूमापन याबाबत जनजागृती केली. महिला बचत गटांनी घरगुती उत्पादनांचे स्टॉल लावले, तर अंगणवाडी सेविकांनी बालसंगोपन उपक्रमाची माहिती दिली. न्यायालयातील शैलेश कोंडसकर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय करून देत न्याय विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.
उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी अभियानाचे महत्त्व सांगितले, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवल्या जात असल्याचे नमूद केले. कार्यक्रमादरम्यान विविध दाखल्यांचे प्रतीकात्मक वाटप करण्यात आले तसेच वाजे गावाचा नकाशा ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आला. रक्तदान शिबिरात २१ जणांनी सहभाग घेतला.

कोट :
महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचवत आहोत. यामुळे नागरिकांची कार्यालयांतील धावपळ कमी होत असून विविध कामे एकाच ठिकाणी तात्काळ पूर्ण होत आहेत. नागरिकांचा वेळ व श्रम वाचून योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे.
— जितेंद्र इंगळे, अप्पर तहसीलदार, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com