नाट्यसंमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी

नाट्यसंमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी

Published on

नाट्यसंमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी
नियामक मंडळाच्या सभेत एकमताने निवड

मुंबई, ता. २० : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या १०१व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या नियामक मंडळाची बुधवारी (ता. १८) सभा झाली. त्यात जोशी यांची एकमताने निवड झाल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी कळवले.
मोहन जोशी यांनी चित्रपट, नाटक, मालिका अशा विविध माध्यमांत विविध व्यक्तिरेखा साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. नाट्य क्षेत्रातील निर्माते, लेखक, कलावंत, तंत्रज्ञ, नाट्य व्यवसायातील कामगारांसह नाटकाच्या विविध प्रवाहांतील कार्यकर्त्यांशीही त्यांचा ऋणानुबंध आहे. त्यामुळे नाट्यसंमेनाध्यक्ष म्हणून त्यांचे चिंतन मराठी रंगभूमीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाचे औचित्य साधून परिषदेने १००व्या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यमहोत्सव आयोजित करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार १००व्या नाट्यमहोत्सवाची सांगता २४ ते २६ एप्रिलदरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे. तत्पूर्वी १०१व्या संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे संमेलन कोठे होणार, याचीही उत्सुकता वाढली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com