नाविन्य पूर्ण उपक्रम शैक्षणिक विभागाला फायदा

नाविन्य पूर्ण उपक्रम शैक्षणिक विभागाला फायदा

Published on

नाविन्य पूर्ण उपक्रमाचा शैक्षणिक विभागाला फायदा
ठाणे महापालिका शाळांचा पट एक हजार ९४२ ने वाढला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा, तांत्रिक साधनांचा अभाव आणि स्थलांतर यांसारख्या कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी महापालिका शाळांकडे पाठ फिरवली होती. २०२२-२३ मध्ये सुमारे ३३ हजारांवर असलेली पटसंख्या २०२४-२५ मध्ये सुमारे ३० हजारांपर्यंत घसरली होती. याची दाखल घेत, शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेवर भर देत, विविध उपक्रम, प्रवेश मोहिमा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे यंदाच्या वर्षी पटसंख्येत सुमारे १ हजार ९०० विद्यार्थ्यांची वाढ झाल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध योजनांमुळे आणि सुधारित सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा महापालिका शाळांकडे वाढत असल्याचे अर्थसंकल्पातून समोर आले आहे. महापालिकेच्या एकूण १९४ शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘आदर्श शाळा’ संकल्पनेअंतर्गत ६२ शाळांची निवड केली असून, त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. आगामी काळात सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलींसाठी कराटे प्रशिक्षण, प्रत्येक शाळेत प्रथमोपचार कक्ष, नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणी, तसेच पर्यावरणपूरक ‘संवाद आपल्या वृक्षांशी’ आणि ‘ड्राय वेस्ट बँक’ यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, शौचालयांमध्ये अलार्म प्रणाली उभारणे यासारख्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तसेच, लैंगिक शिक्षण आणि आहारशास्त्र विषयक कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना व्यापक मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष मोहिमाही राबविण्यात येत आहेत. घरभेटी, पालकांशी थेट संवाद, स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग, तसेच प्रवेश मोहिमा यांच्या माध्यमातून महापालिका शाळांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षण विभागासाठी दरवर्षी वाढती आर्थिक तरतूद करण्यात येत असून, आगामी आर्थिक वर्षासाठीही मोठा निधी प्रस्तावित आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर
मराठी माध्यमाच्या शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. काही शाळांमध्ये सोलार ऑपरेटेड रोबोटिक्स, कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. तसेच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी व्यावसायिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

आर्थिक वर्ष - मंजुर तरतूद (कोटीत) - प्रत्यक्ष खर्च (कोटीत
२०२१-२२ - २०३.७१ - १७४.६५
२०२२-२३ - २४८.२३ - २१६.५३
२०२३-२४ - २९६.४३ - २६९.२८
२०२४-२५ - ३२९.४३ - ३०७.५७
२०२५-२६ - ३५९.३५ - २२३.२७ (डिसेंबर अखेर)

ठाणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभाग पटसंख्या
वर्ष - पटसंख्या
२०२०-२१ - २३०५०
२०२१-२२ - २६२०३
२०२२-२३ - २७४८९
२०२३-२४ - २३८९५
२०२४-२५ - २५१९५
२०२५-२६ - २७१३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com