

जयपूर एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण
आरोपी चेतनसिंह चौधरीला
मनोरुग्णालयात दाखल करा!
दिंडोशी न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. २६ : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून तीन प्रवाशांची निर्घृण हत्या करणारा रेल्वे पोलिस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतनसिंह चौधरीला पुन्हा ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल करा, असे आदेश दिंडोशी न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले.
चौधरीने नव्याने मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे कारण सांगून जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिंडोशी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश प्रवीण चतुर यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील आदेश दिला जाईपर्यंत चौधरी याला अधिक चांगले व्यवस्थापन, देखभाल आणि उपचारांसाठी ठाणे मनोरुग्णालयात दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना दिले. ठाणे मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौधरी याच्यावरील उपचार आणि मानसिक आरोग्याबाबत दर १५ दिवसांनी अहवाल सादर करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. याआधीही चौधरीला २० फेब्रुवारी ते १२ जुलै २०२५ या कालावधीत ठाणे येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पालघर रेल्वे स्थानकाजवळ ३१ जुलै २०२३ला जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून त्याचे वरिष्ठ सहकारी सहाय्यक उपनिरीक्षक टीका राम मीणा आणि तीन प्रवाशांवर गोळीबार करून हत्या केल्याचा चेतनसिंह याच्यावर आरोप आहे.