

डोंबिवलीत मंगळवारी फेरीवाल्यांचा एल्गार
पुनर्वसनाच्या मागणीसाठी पालिकेवर मोर्चा
डोंबिवली, ता. २८ : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या महापालिकेच्या कठोर कारवाईमुळे फेरीवाले आक्रमक झाले आहेत. वारंवार होणाऱ्या जप्ती आणि दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ, तसेच हक्काच्या पुनर्वसनासाठी मंगळवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय फेरीवाल्यांनी घेतला आहे.
शुक्रवारी कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेते, डोंबिवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. प्रशासन केवळ कारवाई करत आहे; पण कायद्यानुसार आमचे पुनर्वसन का करत नाही, असा संतप्त सवाल या वेळी फेरीवाल्यांनी उपस्थित केला. २०१४च्या पथविक्रेता कायद्याची (जीविका संरक्षण व नियमन) तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
मेळाव्यात बोलताना फेरीवाला प्रतिनिधींनी प्रशासनाच्या धोरणांवर सडकून टीका केली. २०१४ मध्ये फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि नोंदणी होऊनही आज १० वर्षे उलटली तरी त्यांना अधिकृत जागा मिळालेली नाही. आम्हालाही सन्मानाने जगण्याचा आणि उपजीविकेचा अधिकार आहे. पालिकेने मानवी दृष्टिकोनातून आमचा विचार करावा, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. फेरीवाला नेते भाऊ पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारताना, पुनर्वसनाची प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला.
मोर्चाचा मार्ग आणि ‘जेलभरो’चा इशारा
मंगळवारी निघणारा हा मोर्चा डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून सुरू होईल. त्यानंतर भाजी मार्केट, बाजीप्रभू चौक आणि इंदिरा गांधी चौकमार्गे हा मोर्चा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर धडकणार आहे. जर या मोर्चानंतरही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील टप्प्यात तीव्र ‘जेलभरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.