

भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : विवाहित महिलेचा पाठलाग करत तिच्या घरात घुसून जबरी अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथ ऊर्फ लाल्या पाटील (वय ३८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विश्वनाथ जुलै २०२५ पासून पीडित महिलेचा वारंवार पाठलाग करत होता. याबाबत पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. २६ मार्चला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडितेने शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल केले. त्याला याप्रकरणी अटक केली असून भिवंडी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शांतीनगर पोलिस करत आहेत.