

भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : भिवंडी महापालिकेच्या १५ जानेवारीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही माजी नगरसेवकांच्या नातेवाइकांची नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. मात्र, हे नवनिर्वाचित नगरसेवक प्रत्यक्ष कामात सक्रिय नसून, त्यांच्या नातेवाइकांकडून पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप केला जात आहे. यामुळे कर्मचारी व प्रभाग अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
महापालिकेत सध्या मालमत्ता करवसुली मोहिमेला वेग देण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वसुली विभागातील लिपिक, प्रभाग कार्यालयातील कर्मचारी, बिट निरीक्षक आदींना मालमत्ताधारकांकडून थेट वसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कर्मचारी पोलिस संरक्षणाशिवाय दारोदारी जाऊन वसुली करत आहेत. अशा वेळी काही मालमत्ताधारक कर भरण्यास टाळाटाळ करत नगरसेवकांना संपर्क साधत आहेत. मात्र, नगरसेवक पुढे न येता त्यांच्या नातेवाइकांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. काही प्रकरणांत माजी नगरसेवक पुढे येत कर्मचाऱ्यांना दमदाटी करत आहेत. अशा प्रकारे सरकारी कामात अडथळा निर्माण करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वीही अशा घटनांमुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षात वसुली कमी झाल्याने नऊ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तांकडे तक्रार
पीपल रिपब्लिकन पार्टीचे भिवंडी शहर उपाध्यक्ष मोहम्मद सिद्धिक फक्की यांनी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे तक्रार करत संबंधित नातेवाइकांवर पोलिस कारवाईची मागणी केली आहे. या हस्तक्षेपामुळे पालिकेतील कर्मचारी व अधिकारी अस्वस्थ आहेत. अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या मुद्द्यावर पालिकेतील भारतीय कामगार कर्मचारी महासंघ संघटना आक्रमक झाली असून, आंदोलनाच्या तयारीत आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.