

कल्याण रेल्वे स्थानकात राडा
किरकोळ कारणावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी
कल्याण, ता. २९ (बातमीदार) : कल्याण रेल्वे स्थानकावर किरकोळ कारणावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यात मध्यस्थी करणारा एक दिव्यांग प्रवासीही खाली पडल्याने संतापला आणि त्यानेही एका प्रवाशाला चोप दिला. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधून उतरताना दोन प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली. याचे रूपांतर सुरुवातीला शाब्दिक वादात झाले; मात्र काही क्षणात या दोन्ही प्रवाशांचा ताबा सुटला आणि त्यांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव सुरू केला. भर प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या या ‘फ्री स्टाइल’ हाणामारीमुळे इतर प्रवाशांची धावपळ उडाली. दोघांमधील वाद विकोपाला गेलेला पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका दिव्यांग प्रवाशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र झटापटीत या दिव्यांग व्यक्तीचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. यामुळे संतापलेल्या दिव्यांगाने उठल्यानंतर थेट एका प्रवाशावर हल्ला चढवला. मध्यस्थी करायला आलेला माणूसच मारहाण करू लागल्याने प्लॅटफॉर्मवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रवाशांच्या वाढत्या आक्रमकतेवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीमुळे संयम सुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी सामंजस्याने वागावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.