महापालिकेचे मुख्यालय अधांतरी

महापालिकेचे मुख्यालय अधांतरी
Published on

महापालिकेचे मुख्यालय अधांतरी
प्रशासकीय इमारतीसाठी पुन्हा नवीन जागेची चर्चा
भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयासाठी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काशीमिरातील एका भूखंडावर भूमिपूजन केले होते, परंतु मिरा रोड येथील शिवार गार्डन परिसरातील जागेवर ही इमारत बांधण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
भाईंदर पश्चिम येथील मुख्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. २०१७ मध्ये मिरा रोड येथील एस.के.स्टोन परिसरातील टाऊन पार्कसाठी आरक्षित खासगी भूखंडावर नवी इमारत बांधण्याचे नक्की करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीचे भूमिपूजन केले होते. मात्र, ती जमीन सरकारी असल्याचा आरोपामुळे प्रशासकीय इमारतीचे काम सुरू होऊ शकले नाही. अजूनही ते प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी २०२२ मध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गालगत काशीमिरा परिसरातील एका सुविधा भूखंडावर प्रशासकीय इमारत बांधण्याची घोषणा केली. विकसक स्वखर्चाने महापालिकेला इमारत बांधून देणार होता. मात्र, भूखंडाच्या आसपासच्या खासगी जागांवर आरक्षण टाकून त्याची भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अशातच आता आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा रोड येथील शिवार गार्डन परिसरातील दोन एकरच्या भूखंडावर नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे.
-------------------------
शहराच्या मध्यभागी हा भूखंड असल्याने सोयीचा आहे. तसेच येथे महापालिकेचे वाहनतळही आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारत बांधणे शक्य आहे.
- नरेंद्र मेहता, आमदार

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com