‘नगररचना महसूल घसरण’ ठरली नवी चिंता

‘नगररचना महसूल घसरण’ ठरली नवी चिंता
Published on

महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक
मालमत्ता करासह नगररचना महसुलात घट
डोंबिवली, ता. ३१ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीवर यंदा आर्थिक मंदीचे सावट आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडताना पालिकेला केवळ मालमत्ता करवसुलीतच नव्हे, तर उत्पन्नाचा कणा मानल्या जाणाऱ्या नगररचना विभागाच्या महसुलातही प्रचंड फटका बसला आहे. ६०० कोटींच्या लक्ष्यासमोर मालमत्ता करात १९३ कोटींची तूट राहिली असतानाच नगररचना विभागाचा महसूल २९३ कोटींनी घसरल्याने पालिकेची आर्थिक शिस्त बिघडली आहे.

प्रशासनाने यंदा मालमत्ता करातून ६०० कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ ४०७ कोटी रुपयेच पालिकेच्या पदरात पडले आहेत. यामध्ये चालू कराचे २९०.५९ कोटी आणि जुन्या थकबाकीचे ११६.४४ कोटी रुपये समाविष्ट आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांनी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लक्ष्यांक देऊन कारवाईचा इशारा दिला होता, तरीही अपेक्षित यश मिळाले नाही. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ११ कोटींची वसुली करून खिंड लढवली, पण ती तुटीचा डोंगर कमी करण्यास अपुरी ठरली.

महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये वसुलीचे चित्र अत्यंत विषम राहिले आहे. ‘ब’ आणि ‘ह’ प्रभागाने चांगली कामगिरी केली असली तरी ‘ई’ आणि ‘आय’ प्रभागाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. एकूणच महसुली उत्पन्नातील ही मोठी घट आगामी काळात विकासकामांच्या नियोजनावर परिणाम करण्याची शक्यता आहे. नगररचना विभागातील या घसरणीवरून आगामी महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

नगररचना विभागाची कासवगती
यंदा सर्वाधिक धक्कादायक ठरली ती नगररचना विभागाची कामगिरी. दरवर्षी ३५० ते ४०० कोटींचा महसूल देणारा हा विभाग यंदा सपशेल अपयशी ठरला आहे. बांधकाम परवानग्या, विकास शुल्क आणि प्रीमियममधील कमालीच्या घटीमुळे तब्बल २९३ कोटींची महसूल घट नोंदवण्यात आली आहे. विभागांतर्गत असणारी स्पर्धा, महत्त्वाच्या पदांवरील चढाओढ आणि निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे हा विभाग यंदा नगरसेवकांच्या आणि प्रशासनाच्या रडारवर आला आहे.

प्रभागनिहाय वसुलीचा ताळेबंद (कोटीत)
प्रभाग लक्ष्यांक प्रत्यक्ष वसुली
अ प्रभाग ९४ ४४
ब प्रभाग ८५ ७५
क प्रभाग ९३ ५१
ड प्रभाग ३५ २८
ई प्रभाग १०५ ५३
फ प्रभाग २८ ३१ (उद्दिष्ट पूर्ण)
ग प्रभाग ३० २७
ह प्रभाग ४६ ४१
आय प्रभाग ४० १६
जे प्रभाग ३९ २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com