

‘चित्रपताका’ त्रैमासिक प्रकाशित
मुंबई, ता. २ : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘चित्रपताका’ या पहिल्या त्रैमासिकाचे प्रकाशन संपादक तथा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’या विषयावर आधारित हे मासिक असून, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या अंकात मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्व, स्त्रीप्रतिमा आणि स्त्रीच्या सर्जनशील सहभागाचा वेध घेणारे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
सिनेमा हा केवळ मनोरंजनाचा उद्योग नसून तो समाजाच्या भावविश्वाचा आरसा आहे. म्हणूनच या माध्यमाभोवती घडणाऱ्या चर्चांना आणि विचारमंथनाला एक सर्जनशील व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सिनेमा या व्यापक कलामाध्यमाभोवती घडणारे विचारप्रवाह, त्यासंबंधीचे अनुभव आणि स्मृती यांविषयीचा रचनात्मक संवाद घडावा या उद्देशाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून ‘चित्रपताका’ हे त्रैमासिक सुरू करण्यात आले आहे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, नव्या पिढीचे प्रयोग, सिनेउद्योगासमोरील आव्हाने आणि संधी, तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचे अनुभव आणि चिंतन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक आणि प्रकाशक तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, विशेष कार्यकारी अधिकारी सुचित्रा देशपांडे यांनी संपादकीय सल्लागार जबाबदारी सांभाळली आहे.