

खारघर, ता. ३ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरगुती ‘पाईप्ड नॅचरल गॅस’ (पीएनजी) जोडणीकडे मोठ्या प्रमाणावर कल दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) कंपनीने मार्चमध्ये मुंबई महानगर प्रदेशासह विविध भागांमध्ये तब्बल ५० हजार घरांना पीएनजी जोडणी दिली आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, रायगड; तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये पीएनजी आणि सीएनजी पुरवठा केला जातो. फेब्रुवारीमध्ये १६ हजार घरांना गॅसजोडणी दिली होती. मात्र, मार्चमध्ये वाढलेल्या मागणीमुळे ही संख्या थेट ५० हजारांवर पोहोचली आहे, अशी माहिती महानगर गॅसच्या शाखा व्यवस्थापक नीरा अस्थाना-फाटे यांनी दिली. सध्या अनेक भागांत एलपीजी सिलिंडरसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने पीएनजी हा अधिक सोयीस्कर आणि सातत्यपूर्ण पर्याय म्हणून नागरिकांकडून स्वीकारला जात आहे. केंद्र व राज्य सरकारने पीएनजी पुरवठ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी परवानग्या देण्यास गती दिल्यामुळे महानगर गॅसने निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना जोडणी देण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे.
ग्राहकांना त्वरित सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी अनेक निवासी संकुलांमध्ये आधीच गॅसवाहिनीचे जाळे उभारले आहेत. आवश्यक परवानग्या मिळताच ही सेवा सुरू केली जात आहे. दरम्यान, गॅसजोडणीसाठी खोदकाम करताना अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, खोल नाले; तसेच जमिनीखालील वीजवाहिन्यांमुळे विविध अडचणी निर्माण होत असल्याचे अस्थाना यांनी स्पष्ट केले.
निवासी व व्यावसायिक आस्थापनांना गॅसजोडणी देताना अनेक तांत्रिक व भौगोलिक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही या सर्व अडचणींवर मात करत पुढील तीन महिन्यांत जास्तीत जास्त घरांना गॅस पुरवठा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- नीरा अस्थाना-फाटे, शाखा व्यवस्थापक, महानगर गॅस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.