

भिवंडीतील यंत्रमाग मालक हवालदिल
सुताच्या दरात ३० टक्के वाढ; कापड उद्योग ठप्प होण्याची भीती
भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा फटका भिवंडीच्या जगप्रसिद्ध यंत्रमाग उद्योगाला बसला आहे. युद्धामुळे कापड उत्पादनासाठी लागणाऱ्या सुताच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे; मात्र त्या तुलनेत कापडाचे भाव न वाढल्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने माल विकावा लागत असून, कापड उद्योग सध्या तीव्र मंदीच्या सावटाखाली आहे.
शांतीनगर पॉवरलूम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मन्नान सिद्दीकी यांनी सांगितले, की भिवंडीत सुमारे पाच ते सात लाख यंत्रमाग असून दररोज ४२ दशलक्ष मीटर कापड तयार होते; मात्र पेट्रोलियम आधारित कच्च्या मालापासून बनणाऱ्या सिंथेटिक, पॉलिस्टर आणि नायलॉन धाग्याच्या किमती कच्चे तेल महागल्यामुळे २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. मालवाहतुकीच्या शुल्कातही वाढ झाल्याने दुहेरी फटका बसत असल्याचे कापड उत्पादक श्रीनिवास बल्लाळ आणि शीतला प्रसाद मिश्रा यांनी सांगितले.
जॉब वर्कवर संक्रांत
भिवंडीतील बहुतांश छोटे यंत्रमागधारक ‘जॉब वर्क’ (मजुरीने कापड विणणे) करतात. व्यापाऱ्यांनी दिलेल्या जुन्या दरांच्या ऑर्डर्स आता तोट्याच्या ठरू लागल्या आहेत. नवीन ऑर्डर्स मिळणे कठीण झाले असून खरेदीदारांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर कारखाने बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
कामगारांचे स्थलांतर
उद्योगावर अवलंबून असलेले ७० टक्क्यांहून अधिक कामगार परराज्यातील आहेत. व्यवसायातील अनिश्चिततेमुळे कामगारांनी आता आपल्या गावांकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जर कामगारांचा तुटवडा निर्माण झाला, तर उत्पादनाचा कणाच मोडला जाईल. याचा परिणाम केवळ भिवंडीवरच नव्हे, तर मालेगाव आणि इचलकरंजीसारख्या वस्त्रोद्योग केंद्रांवरही होणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी या बिकट परिस्थितीचा त्वरित आढावा घेऊन शासनाकडे मदतीचा अहवाल सादर करावा, अशी मागणी यंत्रमाग मालक आणि कामगारांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.