लग्नसराई, यात्रोत्सवांमुळे व्यावसायिक तेजीत

लग्नसराई, यात्रोत्सवांमुळे व्यावसायिक तेजीत
Published on

लग्नसराई, यात्रोत्सवांमुळे व्यावसायिक तेजीत

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यासह ग्रामीण भागात सध्या लग्नसराईचा हंगाम आणि विविध यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असल्याने मंडप डेकोरेशन, छायाचित्रकार, फूलविक्रेते, आचारी, वाजंत्री तसेच केटरिंग व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. जानेवारी ते मे या कालावधीत लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम आणि गावोगावच्या जत्रा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या सर्व व्यवसायांना मागणी निर्माण झाली आहे.

यंदा विशेषतः लग्नसमारंभांची संख्या वाढलेली दिसून येते. त्यामुळे मंडप उभारणी, लाइटिंग, सजावट, डीजे, बँड पथक, छायाचित्रण अशा सेवांसाठी आधीच बुकिंग होत असून, व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. लग्नसमारंभातील जेवणावळ ही महत्त्वाची बाब असल्याने केटरिंग व्यावसायिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक पदार्थांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध करून देत केटरर्स चांगली कमाई करत आहेत. आचारी आणि मदतनीसांनाही या काळात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत.

दरम्यान, वर्षभरातून एकदा येणाऱ्या यात्रा उत्सवांनाही गर्दी होत असते. विक्रमगड परिसरातील रामनवमी निमित्त होणारी यात्रा, कृंझे गावातील हनुमान जयंती यात्रा, तसेच नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मी देवीची यात्रा आणि बोहाडे यांसारख्या पारंपरिक उत्सवांना ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या यात्रांमुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही चांगली संधी मिळत आहे. खेळणी, मिठाई, खाद्यपदार्थ, पूजा साहित्य, कपडे व विविध घरगुती वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांची उलाढाल वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्राला चालना मिळत असून अनेक कुटुंबांना याचा आर्थिक लाभ होत आहे. एकंदरीतच लग्नसराई आणि यात्रा उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विविध व्यवसायांना नवसंजीवनी मिळत असून, हा हंगाम स्थानिक व्यावसायिकांसाठी खऱ्या अर्थाने सुगीचा ठरत आहे.
लग्नसमारंभ व इतर समारंभांसाठी विविध प्रकारच्या शोभिवंत फुलांची सजावटीसाठी मोठी मागणी असते, तर वधू-वरांच्या लग्नघरी हार, फुले, गजरे, वेण्या, तोरणे अशा विविध प्रकारच्या आर्डर फुल व्यावसायिकांना मिळतात, असे फुलविक्रेते विलास पाडवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com