ठाण्यात ‘डिजिटल जनगणना’ मोहीम

ठाण्यात ‘डिजिटल जनगणना’ मोहीम
Published on

ठाणेकरांची यंदा ‘डिजिटल जनगणना’
१ मेपासून स्वयं-नोंदणीला सुरुवात; पालिकेची यंत्रणा सज्ज
ठाणे, ता. ९ : शहरातील आगामी जनगणना प्रक्रिया यंदा पूर्णपणे हायटेक होणार आहे. ठाणे महापालिकेने ही प्रक्रिया तंत्रज्ञानाधारित पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांना मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ‘स्वयं-नोंदणी’ची संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी ‘एचएलओ’ नावाचे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, यामुळे कागदपत्रांचा पसारा कमी होऊन जनगणना अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.

महापालिकेच्या जनगणना विभागाने या मोहिमेसाठी कंबर कसली असून, शहरातील नऊ प्रभागांतील क्षेत्रीय प्रशिक्षकांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष कामात त्रुटी राहू नयेत यासाठी काही भागांत ‘हाउस लिस्टिंग’ची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. डिजिटल जनगणनेमुळे शहराच्या नियोजनासाठी आवश्यक असलेली आकडेवारी अचूकपणे उपलब्ध होईल. नागरिकांनी १ मे ते १५ मे या काळात ऑनलाइन नोंदणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे.

अशी असेल नोंदणीची प्रक्रिया
स्वयं-नोंदणी (१ ते १५ मे) : नागरिक विशेष पोर्टल किंवा अ‍ॅपद्वारे स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. नोंदणी पूर्ण झाल्यावर एक ‘युनिक कोड’ मिळेल.

घरपोच पडताळणी (१६ मे पासून) : ज्या कुटुंबांनी स्वयं-नोंदणी केली आहे, त्यांच्या घरी प्रगणक येऊन केवळ कोडची खातरजमा करतील. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांची माहिती प्रगणक प्रत्यक्ष घरी जाऊन अ‍ॅपमध्ये भरतील.

अचूकता आणि वेग : डिजिटल पद्धतीमुळे माहितीचे संकलन जलद होणार असून, मानवी चुकांची शक्यता कमी होणार आहे.

अ‍ॅपमध्ये ३३ प्रश्ने
यंदाच्या जनगणनेत केवळ लोकसंख्याच नाही, तर नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जाही मोजला जाणार आहे. अ‍ॅपमध्ये घरासंदर्भात एकूण ३३ प्रश्न विचारले जातील. यामध्ये प्रामुख्याने घराची मालकी, मालकाचे नाव, घराचे प्रकार तसेच घरात उपलब्ध असलेल्या सुविधा जसे की टीव्ही, फ्रीज, लादी, मोबाईल इत्यादींचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com