

पोटनिवडणुकींचे बिगुल वाजले
वसई तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार
विरार, ता. १० (बातमीदार) : वसई तालुक्यातील सहा विविध ग्रामपंचायातींमधील रिक्त झालेल्या सदस्यपदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर ६ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर कारणांमुळे ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत रिक्त झालेल्या सदस्य पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. वसई तालुक्यातील खार्डी-डोलीव, चंद्रपाडा, शिरवली, पाणजू, माजिवली-देपिवली आणि रानगाव या सहा ग्रामपंचायतींमधील सात जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे. ३० मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान वसई तहसील कार्यालयात उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. १५ एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार असून, १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचदिवशी पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्यानंतर २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल आणि बुधवार, ६ मे रोजी या पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वसई तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
=======================================
या जागांसाठी होणार पोटनिवडणूक
* शिरवली :
प्रभाग १ (अ) - अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग
प्रभाग ३ (क) - सर्वसाधारण महिला प्रवर्ग
* खार्डी-डोलीव :
प्रभाग १ - सर्वसाधारण महिला प्रवर्ग
* चंद्रपाडा :
प्रभाग ४ - अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग
* रानगाव :
प्रभाग १ - अनुसूचित जमाती प्रवर्ग
* माजिवली-देपिवली :
प्रभाग २ (ब) - अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग
* पाणजू :
प्रभाग २ (अ) - सर्वसाधारण प्रवर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.