

मुंबई-बंगळूर वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी
१८ तासांचा प्रवास १०-१२ तासांत; प्रवाशांना मोठा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई ते बंगळूरदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळूर सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांच्या मागणीस मान्यता देत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई ते बंगळूरदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दोन्ही शहरांमधील जलद आणि आरामदायी प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई-बंगळूरदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी खासदार पी. सी. मोहन यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक भूमिका घेत निर्णय जाहीर केला. दक्षिण व पश्चिम भारतातील दोन प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि आयटी केंद्रांना जोडणारी ही पहिली वंदे भारत स्लीपर सेवा ठरणार असल्याने या प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या या मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांना प्रवासासाठी सुमारे १८ ते २२ तास लागतात; मात्र ताशी १६० किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत स्लीपरमुळे हा प्रवास केवळ १० ते १२ तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा जवळपास आठ तासांचा वेळ वाचणार असून व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी हा मोठा फायदा ठरणार आहे.
- प्रीमियम प्रवास सुविधा
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर सेवा १७ जानेवारी २०२६ पासून हावडा-कामाख्या मार्गावर यशस्वीपणे सुरू आहे. त्याच धर्तीवर आता मुंबई-बंगळूर मार्गालाही प्रीमियम श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित डिझाइन आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन या गाडीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
- आरएसीची सुविधा नाही
या गाडीत प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि शांत प्रवासाचा अनुभव देण्यासाठी केवळ कन्फर्म तिकीटधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आरएसीची सुविधा नसल्यामुळे डब्यांमध्ये अनावश्यक गर्दी होणार नाही. प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र जागा, अधिक गोपनीयता आणि व्यवस्थित प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याने ही सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.