

रेल्वे रुळामध्ये तांत्रिक बदल
कम्पोझिट स्लीपर्सचा निर्णय; सुरक्षिततेला बळकटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : रेल्वे रूळ अधिक सुरक्षित आणि टिकाऊ करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचे तांत्रिक बदल जाहीर केले आहेत. ब्रिज ॲप्रोच तसेच पॉइंट्स अँड क्रॉसिंग्ज भागात आता आधुनिक कम्पोझिट स्लीपर्स वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या वापरात असलेल्या काँक्रीट आणि लोखंडी स्लीपर्सच्या तुलनेत कम्पोझिट स्लीपर्स हलके असून, अधिक भार सहन करण्यास सक्षम आहेत. त्यांचे कुशनिंगही अधिक प्रभावी असल्याने गाड्या धावतानाचे धक्के कमी होतील. परिणामी प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. तसेच हे स्लीपर्स बसविणे आणि दुरुस्ती करणे सोपे असल्याने देखभाल खर्चातही बचत होणार आहे.
विशेष म्हणजे पूल आणि क्रॉसिंग परिसरातील तांत्रिक गरजेनुसार या स्लीपर्सची रचना करता येणार आहे. त्यामुळे ट्रॅकची स्थिरता वाढण्यास मदत होईल. रेल भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे स्लीपर्स प्रति चौरस सेंटीमीटर सुमारे ७०० किलोपर्यंत भार सहन करू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एआयकडून ट्रॅकवर नजर
ट्रॅक देखरेख अधिक अचूक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तपासणी वाहनांमध्ये एआयआधारित यंत्रणा बसवून ग्राउंड पेनिट्रेशन रडारच्या सहाय्याने रुळांच्या पायाभूत स्थितीची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय रुळांवरील वेल्डिंगची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे वेल्डिंगमधील सूक्ष्म दोष लवकर ओळखता येणार असून, रेल्वे सुरक्षिततेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.