

गणपती संस्थानच्या जागेवर अतिक्रमण
संस्थानसह महड ग्रामस्थांची कारवाईची मागणी
खालापूर, ता. १२ (बातमीदार) ः अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या महड येथे श्री गणपती संस्थानच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. कोणतीही परवानगी न घेता रात्रीतून अनधिकृत संरक्षक भिंत बांधल्याने महड ग्रामस्थ आणि देवस्थान प्रशासनामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याप्रकरणी संस्थानने नगरपंचायत, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गापासून दीड किमीवर असलेल्या महड मंदिर परिसरात संस्थानची शेकडो एकर जमीन आहे. महामार्गावर मंदिराकडे जाताना असलेल्या मोक्याच्या जागेवर काही अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू केले. ग्रामस्थांनी हे काम एकदा बंद पाडले होते; मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पुन्हा बांधकाम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेला देवस्थानचा अधिकृत फलकही काढून टाकण्यात आला आहे.
संस्थानचे व्यवस्थापक अतुल तट्टू आणि राजेंद्र बडगुजर यांनी नगरपंचायत खालापूर, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाणे या ठिकाणी लेखी तक्रार अर्ज दिले आहेत. सोबत संस्थानाचा सातबारा आणि आठ अ उतारा अशी कागदपत्रे दिली असून दोषींवर कारवाई करावी आणि देवस्थानच्या जमिनीचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महड परिसरात इनामदार आणि गुरचरण अशी मोठ्या प्रमाणात जागा आहे. संस्थानच्या नावावर शेकडो एकर जमीन असून, या जागेचा उपयोग धार्मिक तसेच भविष्याच्या दृष्टीने विकासासाठी करण्यात येणार आहे. परंतु तालुक्यातील जमिनीला आलेला सोन्याचा भाव याचा फायदा उचलत दलालांची मोठी टोळी या भागात कार्यरत असून, या टोळीने गुरचरण जमिनी विकण्याचा सपाटा चालवला आहे.
अतिक्रमण हटवण्याचे आदेश
हे अतिक्रमण हटवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर अतिक्रमणधारकाने स्वतः न काढल्यास त्यावर नगर पंचायतीतर्फे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगर पंचायत प्रशासनाने दिली आहे.
ही जागा श्री देवस्थान संस्थान, महडच्या मालकीची असून, या ठिकाणी लावलेला संस्थानचा फलकदेखील काढून टाकला होता. याबाबत सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटवण्याचा आदेश दिला असून, नगर पंचायतीकडे अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.
- मोहिनी वैद्य, कार्याध्यक्षा - श्री गणपती संस्थान, महड
हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी दररोज हजारो भक्त येत असतात. भाविकांच्या दृष्टीने भविष्यात विविध सोयी-सुविधांसाठी जागेची गरज आहे. अशा प्रकारे अतिक्रमण होऊन जागा हडप करण्यात येत असेल तर ग्रामस्थ पूर्णपणे श्री गणपती संस्थानच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
- मंदार जोशी, महड ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.