

पोशीर-शिलार प्रकल्पाविरोधात जनआंदोलनाची तयारी
पनवेल-नवी मुंबई-बदलापूर-अंबरनाथसाठी प्रस्तावित धरणे वादाच्या भोवऱ्यात
कर्जत, ता. १३ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर व शिलार धरण प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. रविवारी (ता. १२) बोरगाव येथे झालेल्या विशेष बैठकीत संघर्षाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते ॲड. कैलास मोरे उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांना कायदेशीर लढा कसा उभा करायचा याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांनी बैठकीत आपल्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले की, धरण उभारणीमुळे गावांचे अस्तित्व धोक्यात येणार असून, पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस हमी नाही. आमची जीवनशैली उद्ध्वस्त करून शहरांना पाणी देण्यात काय अर्थ, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. पाली-भुतिवली, बालगंगा, मोरबे आणि कोयना धरणग्रस्तांच्या उदाहरणांचा उल्लेख करत विस्थापितांच्या दीर्घकालीन संघर्षाची आठवणही या वेळी करून देण्यात आली. दरम्यान, पोशीर धरणामुळे बोरगाव, चई, चेवणे, उंबरखांड, भोपळेवाडी, पेंढरी व बोन्डेशेत या गावांतील शेकडो कुटुंबे विस्थापित होण्याची शक्यता आहे, तर शिलार धरणामुळे शिलार, धोत्रे व धोत्रेवाडी या गावांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र असंतोष पसरला असून, जनआंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
पनवेल, नवी मुंबई आणि बदलापूरसारख्या शहरांची तहान भागणार
पोशीर नदीवरील सुमारे १२.३४४ टीएमसी क्षमतेच्या धरणासाठी तब्बल सहा हजार ३९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, मुंबई महानगर क्षेत्राला पाणीपुरवठा हा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पातून मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणी देण्याचे नियोजन आहे. तसेच शिलार नदीवरील ६.६१ टीएमसी क्षमतेच्या धरणासाठी ४,८६९ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पातून पनवेल व नवी मुंबईला पाणीपुरवठा केला जाणार आहे. प्रकल्प राबवण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, नवी मुंबई महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.