

नाट्यगृहांच्या भाडेवाढीचा प्रेक्षकांवर भुर्दंड?
निर्मात्यांची नाराजी; स्थगिती देण्याची पालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेने नाट्यगृहांसाठी १ एप्रिलपासून सुमारे चार हजार रुपयांपर्यंत भाडेवाढ लागू केल्याबाबत नाट्यनिर्मात्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या भाडेवाढीमुळे नाटकांचे तिकीटदर वाढविण्याशिवाय नाट्यनिर्मात्यांपुढे पर्याय नसल्याने नाट्यरसिकांना अधिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त तिकीटदर लावल्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होईल, अशीही भीती व्यक्त करीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने भाडेवाढीला स्थगिती देण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.
दरवर्षी केवळ पाच टक्के भाडेवाढ करण्याचे नियोजन असताना, तो लागू करण्यापूर्वी नव्या प्रस्तावावर चर्चा होणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत नाट्यनिर्माते ५०० रुपयांच्या पुढे तिकीटदर वाढवू शकत नाहीत. त्यापेक्षा अधिक तिकीटदर ठेवल्यास जीएसटी लागू होतो. पर्यायाने त्याचा भार निर्मात्यांवर पडतो. शिवाय जादा तिकीटदर आकारल्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होईल, अशीही भीती निर्मात्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ सुरू राहिल्यास १० वर्षांत नाट्यगृहांचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचा थेट परिणाम नाट्यव्यवसायावर होऊ शकतो. त्यामुळे सध्याची भाडेवाढ स्थगित करून पुढील काळात दर तीन वर्षांनी पाच टक्के भाडेवाढ लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. नाट्यव्यवसाय टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महापालिकेने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नाट्यनिर्मात्यांनी व्यक्त केली.
आमच्या ‘ही दोस्ती तुटायची नाही’ या नाटकाचा सोमवारी (ता. १३) दुपारी ४ वाजता प्रयोग नियोजित होता; मात्र नाट्यगृह साडेतीन वाजता उघडण्यात आल्यामुळे प्रयोग वेळेवर सुरू होऊ शकला नाही. आयुक्तांच्या सूचनेनुसार नाट्यगृह वेळेवर उपलब्ध करून देता येणार नसल्याचे नाट्यगृह व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आमच्यासाठी ही परिस्थिती अडचणीची ठरल्याचे नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी नमूद केले.
----
नाट्यनिर्मात्यांवरच भार का?
प्रत्येक नाटकाला हमखास बुकिंग मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत वाढीव भाडे पेलणे कठीण होईल. महापालिकेकडे उत्पन्नाचे विविध मार्ग असताना, प्रत्येकवेळी नाट्यनिर्मात्यांवरच आर्थिक भार का टाकला जातो, असा सवाल नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी उपस्थित केला.
----------
भाडेवाढ नियमानुसारच!
महापालिकेच्या सर्वच विभागांच्या शुल्कात वाढ केली आहे. त्याच धर्तीवर नाट्यगृहांचीही भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ नियमानुसारच करण्यात आली आहे. कोविड काळात नाट्यगृहाचे भाडे माफ केले होते; मात्र तशी सवलत आता देता येणार नसल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.