

ठाणे, ता. २६ (बातमीदार) : पनीरऐवजी खाद्यपदार्थांमध्ये ॲनालॉग पनीर (वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनवलेले पनीरसदृश उत्पादन)चा वापर ही बाब नवीन नाही. मात्र, त्याची पनीर म्हणूनच विक्री करून ग्राहकांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने आता कडक पावले उचलली असून, हॉटेल, ढाबे आणि फास्टफूड केंद्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवर घटकांची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून, पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पनीर केवळ चविष्टच नाही, तर पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे त्याचे आहारात विशेष स्थान आहे. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्व आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो.
ॲनालॉग पनीर हा पदार्थ घातक नसला तरी त्याची पनीर म्हणून विक्री होणे ही ग्राहकांची सरळ फसवणूक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांच्या आदेशानुसार राज्यभर तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. कोकण विभागीय अन्न व औषध प्रशासनाकडून ठाण्यासह विविध भागातील हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, डेअरी आणि फास्टफूड विक्रेत्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान संबंधित खाद्यपदार्थांवर वापरलेल्या घटकांची माहिती स्पष्टपणे नमूद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. ग्राहकांची कोणत्याही प्रकारे दिशाभूल झाल्यास किंवा चुकीची माहिती देऊन विक्री केल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोकण विभागीय सहाय्यक आयुक्त पराग नलावडे यांनी दिला आहे.
आरोग्यासाठी घातक
काही ठिकाणी बनावट पनीर तयार करण्यासाठी युरिया, डिटर्जेंट आणि मैदा यांचा वापर होत असल्याचेही समोर आले आहे. अशा प्रकारचे पदार्थ आरोग्यास अत्यंत घातक असून, मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विविध पदार्थांचा वापर
शहरात पनीरपासून बनणाऱ्या पदार्थांना मोठी मागणी आहे. पनीर मोमोज, पनीर पिझ्झा, बटर पनीर, पनीर कुलचा, पनीर टिक्का यांसारख्या पदार्थांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली जाते. मात्र, या पदार्थांमध्ये प्रत्यक्ष पनीरऐवजी दूध पावडर, वनस्पती तेल, पाम तेल, स्टार्च, स्टॅबिलायझर्स आदींचा वापर करून तयार केलेले ॲनालॉग पदार्थ वापरले जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे.
पनीर आणि ॲनालॉगमधील फरक
पनीर : केवळ दुधापासून तयार होते. प्रथिनांनी समृद्ध व पौष्टिक.
ॲनालॉग : दूध न वापरता तेल, स्टार्च आणि रसायनांपासून तयार; पनीरसारखे दिसते, पण पोषणमूल्य कमी.
ग्राहकांसाठी आवाहन
खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यातील घटकांची माहिती तपासावी. फसवणूक झाल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
व्यापाऱ्यांसाठी बैठका
पनीर आणि ॲनालॉगमधील फरक स्पष्ट व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या बैठका घेऊन जनजागृतीही केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.