वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पास राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक

वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पास राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक
Published on

वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पास राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक
‘थ्रेड्स ऑफ चेंज’ उपक्रम ठरला पर्यावरणपूरक आणि महिला सक्षमीकरणाचा आदर्श नमुना
जुईनगर, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या ‘थ्रेड्स ऑफ चेंज’ या नावीन्यपूर्ण वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा (टीआरएफ) प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ अंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रम’ गटात राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल महापौर सुजाता पाटील यांनी एप्रिल महिन्यातील सर्वसाधारण सभेत संबंधित विभागाचे विशेष अभिनंदन केले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे यांनी सादर केलेल्या या उपक्रमाने कापडी कचऱ्याचे पुनर्वापरयोग्य संसाधनात रूपांतर करून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकासाचा उत्कृष्ट नमुना निर्माण केला आहे.
सीबीडी बेलापूर सेक्टर-१ येथे स्थापन करण्यात आलेल्या या केंद्रासाठी केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या वस्त्र समितीचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच एसबीआय फाउंडेशन, टिसर आर्टिसन्स ट्रस्ट आणि आयडीएच इंडिया या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. शहरातील १०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांमध्ये वस्त्र संकलन पेट्या ठेवून वापरानंतर टाकून दिल्या जाणाऱ्या कपड्यांचे संकलन केले जाते. त्यानंतर टीआरएफ केंद्रात वर्गीकरण करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कापडांचे प्रकार ओळखले जातात व त्यावर प्रक्रिया केली जाते.
ऑगस्ट २०२५ पासून आतापर्यंत सुमारे ४१,५०० किलो वस्त्र कचरा संकलित करण्यात आला असून, त्यापासून ४०० पेक्षा अधिक उपयुक्त उत्पादने तयार करण्यात आली आहेत. जनजागृतीसाठी ७५ कार्यशाळा आयोजित करून ११,५०० हून अधिक कुटुंबांचा सहभाग मिळवण्यात आला आहे.
महिला सक्षमीकरणालाही या प्रकल्पातून चालना मिळाली आहे. ३०० हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी १५० महिलांना दरमहा ९ ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, आता राज्य शासनानेही या प्रकल्पाचा गौरव केल्याने महापालिकेच्या कामगिरीत भर पडली आहे.
आगामी काळात या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला आहे.

चौकट
पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन :
या प्रकल्पामुळे कापडी कचरा थेट लँडफिलमध्ये न जाता त्याचे पुनर्प्रक्रिया करून उपयुक्त वस्तूंमध्ये रूपांतर होते. यामुळे घनकचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणावरचा ताण घटतो आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

बॉक्स
महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती :
प्रकल्पाद्वारे महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्थिर उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे आर्थिक स्वावलंबन वाढून समाजातील महिलांची भूमिका अधिक सक्षम झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com