लेखिका वीणा गवाणकर यांच्या एक होता कार्व्हरचा सुवर्णमहोत्सवी टप्पा

लेखिका वीणा गवाणकर यांच्या एक होता कार्व्हरचा सुवर्णमहोत्सवी टप्पा
Published on

लेखिका वीणा गवाणकर यांच्या ‘एक होता कार्व्हर’चा सुवर्णमहोत्सवी टप्पा

विरार, ता. २६ (बातमीदार) : ‘एक होता कार्व्हर’ या ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर यांच्या पुस्तकाची पन्नासावी आवृत्ती शनिवारी (ता. २५) त्यांच्या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर, संपादक सदानंद बोसरे, ज्येष्ठ कलादिग्दर्शक विकास गायतोंडे आणि चंद्रकांत गवाणकर हे उपस्थित होते.

अमेरिकेत कृष्णवर्णीय गुलाम म्हणून जन्मलेले शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, शिक्षणासाठी केलेली धडपड, निसर्गाची असणारी ओढ आणि त्याच ओढीतून कृषी क्षेत्रात त्यांनी घडवलेली क्रांती हा प्रवास ‘एक होता कार्व्हर’मधून वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. श्री. ग. माजगावकर यांच्या ‘माणूस’ या दिवाळी अंकात गवाणकर यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरवर लिहिलेल्या हस्तलिखितापासून या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यासह वाचकांनी केलेल्या लेखाच्या कौतुकानंतर ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि १९८१ साली अवघी १५ रुपये किंमत असणारी पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर या पुस्तकाला वाचकांचा इतका उदंड प्रतिसाद एवढा लाभला, की गवाणकर यांना वाचकांनी लिहून पाठवलेल्या पत्रांचे एक बुकलेट तयार करण्यात आले. तसेच २००१ साली दूरचित्रवाणीवर प्रकाशित करण्यात आलेले त्या काळापर्यंतचे ‘एक होता कार्व्हर’ हे पहिले पुस्तक ठरले.

विशेष म्हणजे या यशानंतर लेखिका आणि प्रकाशकांनी रॉयल्टीमधील प्रत्येकी अडीच टक्के रक्कम सामाजिक संस्थांना दान करण्याचा एक नवा आदर्शही घालून दिला. जवळपास ४५ वर्षांचा प्रवास पूर्ण केलेल्या या पुस्तकाची पन्नासावी आवृत्ती शनिवारी ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर यांच्या वसईतील ‘राधा’ या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आली. जुनी ओळख आणि निसर्ग, मातीशी असणारे नाते कायम ठेवत नव्या रूपात ‘एक होता कार्व्हर’ वाचकांच्या भेटीला आले आहे. पुण्याचे चित्रकार राजू देशपांडे यांनी या आवृत्तीला नवे रूप दिले आहे. या नव्या आवृत्तीत अगदी पहिल्यांदाच राजहंस प्रकाशनचे संपादक दिलीप माजगावकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच राजहंसचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरला लिहिलेले अनौपचारिक पत्र हे या नव्या आवृत्तीचे विशेष आकर्षण आहे.
---------
तो आनंद आमच्यासाठी खास
पुस्तकाच्या पन्नासाव्या आवृतीच्या प्रकाशानाबाबत बोलताना संपादक दिलीप माजगावकर म्हणतात, की पन्नासावी आवृत्ती ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे लेखिकेला आपण स्वतः जाऊन ते पुस्तक देणं ही खूप खास गोष्ट आहे. लेखकाला त्याचे पुस्तक अचानक आले की जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो, तो बघायला मला आवडतो. त्यामुळे बरीच वर्षे मी लेखकांना काही न सांगता अचानक त्यांच्याकडे जाऊन त्यांना पुस्तकं दिली आहेत. अशा पद्धतीने पुस्तक पाहिले, की लेखकाला आपलं मूल पाहिल्यासारखा आनंद होतो आणि तो आनंद मला घ्यावासा वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com