

जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृती
प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, मार्गदर्शन व सन्मान सोहळ्यांनी दिन साजरा
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) : जागतिक हिवताप दिनानिमित्त (ता. २५) राजिप आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व जिल्हा परिषद शाळांतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रभातफेरी, जनजागृती मोहिमा, शैक्षणिक उपक्रम व सन्मान सोहळे आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमधून नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
रीस उपकेंद्रांतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळेकडून सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. ‘हिवतापाला आळा घाला’, ‘स्वच्छता ठेवा, डास दूर ठेवा’ अशा घोषणांनी गावात जनजागृती करण्यात आली. या वेळी गट सदस्या नेहा पारंगे, आरोग्य पर्यवेक्षक भस्मा अण्णा, आरोग्यसेवक गणेश भगत, रोशन निंबाळकर, दादासाहेब जगताप यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुमारे ४० विद्यार्थी आणि चार शिक्षकांनी सहभाग घेत नागरिकांना हिवताप प्रतिबंधाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
मोहोपाडा, वासांबे व लोहोप या उपकेंद्रांतर्फेही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. लोहोप येथे सरपंच दीपाली नरेंद्र पाटील, आरोग्य सहाय्यक जी. बी. बडदडे, आरोग्यसेवक एम. एल. तांबडे, आशा व अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. गावागावात घरभेटी देऊन डासांची उत्पत्ती रोखण्यासह स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, रोहा पंचायत समिती व BAUDS फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कै. द. ग. तटकरे सभागृहात विशेष कार्यक्रम पार पडला. यामध्ये हिवतापविषयक माहितीपटाचे सादरीकरण, मार्गदर्शनपर भाषणे व शालेय स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत तालुक्यातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हिवताप निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आरोग्य सहाय्यक, सेवक, सेविका व प्रयोगशाळा अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
हा संपूर्ण उपक्रम राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
चौकट
हिवताप प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना
हिवताप डासांमुळे पसरणारा आजार असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची टाकी झाकून ठेवणे, कचरा साचू न देणे तसेच पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे अशा उपाययोजनांवर भर देण्यात आला. नागरिकांनी ताप, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
चौकट
विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी, निबंध स्पर्धा व जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. घोषणाबाजी, फलक व माहितीपत्रके यांच्या माध्यमातून हिवतापाविषयी संदेश देण्यात आला. तसेच आशासेविका, आरोग्य कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन केल्यामुळे या उपक्रमांना अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.