

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनहक्क, पाणीटंचाई आणि आधार कार्ड यांसारखे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंचायत समिती, कल्याण येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. प्रशासन आणि श्रमजीवी संघटनेच्या समन्वयातून ३१ मेपर्यंत सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचा कालबद्ध कृती आराखडा निश्चित करण्यात आला.
बैठकीला श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर बनसोडे, जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, तालुका अध्यक्ष वासुदेव वाघे, सचिव सुवर्णा कोट, तालुका महिला प्रमुख रूपाली वाघे, महिला सचिव अनिता वायडे, विभाग प्रमुख महेंद्र जाधव, मंगेश जाधव, अर्जुन आवारे आणि सविता वाघे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेने २ एप्रिलला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव व जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देऊन आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर तत्काळ दखल घेत सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना विशेष मोहिमेद्वारे काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर ही समन्वय बैठक घेण्यात आली.
बैठकीला महसूल विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प, तालुका वैद्यकीय अधिकारी, वनविभाग, आदिवासी विभाग, पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामसेवक व विस्तार अधिकारी उपस्थित होते. पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांना तत्काळ पाणीपुरवठा, वंचित कुटुंबांना आधार कार्ड वितरण आणि वनहक्क दाव्यांचा निपटारा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि कालबद्ध नियोजनामुळे आदिवासी बांधवांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
८ मे रोजी विशेष मोहीम
बैठकीत गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांनी वनजमीन, पाणीटंचाई आणि आधार कार्ड या प्रश्नांवर मार्गदर्शक सूचना दिल्या. ८ मे रोजी तालुक्यातील सर्व गावांमधून ज्या आदिवासी कुटुंबांकडे आधार कार्ड नाही, त्यांच्या अर्जांचे नमुने भरून घेण्याचे निर्देश दिले. या प्रक्रियेत गटविकास अधिकारी, तहसीलदार विकास गारुडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा मुंजाळ हे अर्जावर वारसदार म्हणून स्वाक्षरी करून प्रक्रिया पूर्ण करतील, अशी माहिती देण्यात आली. तसेच पुढील १५ दिवसांत पुन्हा आढावा बैठक घेऊन प्रश्नांचा निपटारा करण्याचेही आदेश देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.