

अवजड वाहनांना सहा महिने प्रतीक्षा
मिसिंग लिंकच्या अभ्यासानंतर निर्णय
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उभारलेल्या मिसिंग लिंकच्या प्रवासासाठी अवजड वाहनांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रदिनी (ता. १) उद्घाटन झाल्यानंतर केवळ बस आणि चारचाकी वाहनांनाच मिसिंग लिंकवर प्रवेश असणार आहे. केबल स्टे ब्रिजची क्षमता पुढील सहा महिन्यांत येणाऱ्या अनुभवांचा अभ्यास करून अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
मुंबई-पुणे प्रवासादरम्यान खंडाळा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्चून साडेतेरा किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग आणि केबल स्टे ब्रिज उभारला आहे. उद्घाटन झाल्यानंतर सुरुवातीला केवळ प्रवासी बस आणि चारचाकी वाहनांना या मार्गावर प्रवास करता येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अवजड वाहनांच्या प्रवासासाठी मिसिंग लिंकवरील केबल स्टे ब्रिज सक्षम असला तरी खोल दरीतील १८० मीटरची उंची आणि ९०० मीटर लांबीचा विचार करता कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण एमएसआरडीसीने घेतले आहे. त्यानुसार सुरुवातीला केवळ बस आणि हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. सहा महिन्यांमध्ये सर्व परिस्थितीचा अभ्यास करून अवजड वाहनांना परवानगी दिली जाणार आहे.
रसायनांच्या टँकरला ‘नो एन्ट्री’
विषारी वायू, ज्वलनशील रसायनांची वाहतूक करणाऱ्या टँकरला कायमस्वरूपी नो एन्ट्री असणार आहे. मिसिंग लिंकवर सर्वाधिक लांबीचा सुमारे साडेआठ किलोमीटरचा बोगदा असून, त्यामध्ये अशा टँकरचा अपघात झाल्यास किंवा वायुगळती झाल्यास अनर्थ घडू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्यावर कायस्वरूपी बंदी असेल. त्याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे.
कोट
मिसिंग लिंकवर सुरुवातीला केवळ बस आणि चारचाकी हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहनांबाबत सहा महिन्यांनंतर अभ्यासांती निर्णय घेतला जाईल. घाट मार्ग आणि मिसिंग लिंक अशी दोन्हीकडे वाहनांची विभागणी हाेणार असल्याने द्रुतगती मार्गावरून प्रवास वेगवान होईल.
- डाॅ. अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.