

ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन (सुधारित घ्यावी)
मुंबई, ता. २७ : मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्यापर्यंत प्रभावी अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर (वय ८०) यांचे आज दुपारी ३ वाजता निधन झाले. दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या मुलांनी सांगितले. सायन येथील स्मशानभूमीत संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भरत कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या. खलनायकाच्या भूमिकांतून त्यांनी विशेष छाप पाडली. त्यांच्या दमदार आवाजामुळे आणि प्रभावी सादरीकरणामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळी उंची मिळाली. नूरी (१९७९) या चित्रपटातील बशीर खान ही त्यांची भूमिका विशेष गाजली. याशिवाय राम बलराम (१९८०), लव्ह स्टोरी (१९८१), बाजार (१९८२), गुलामी (१९८५), आखरी रास्ता (१९८६), सत्यमेव जयते (१९८७), सोने पे सुहागा (१९८८) आणि स्वर्ग (१९९०) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
चित्रपटांबरोबरच त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांतूनही प्रेक्षकांची मने जिंकली. ‘अमानत’ या मालिकेतील अहमद खान ही त्यांची सहाय्यक भूमिका विशेष गाजली. तसेच ‘झी हॉरर शो – तावीज’, ‘कॅम्पस’, ‘परंपरा’, ‘आहट’, ‘राहत’, ‘सांस’, ‘संसार’ आणि ‘भाग्यविधाता’ यांसारख्या मालिकांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या.
भरत कपूर यांच्या स्मरणार्थ ३० तारखेला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नॉर्थ बॉम्बे असोसिएशन (पंजाब असोसिएशन) येथे चौथ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, हिंदी चित्रपटसृष्टीने एक दमदार आवाज आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.