जनगणना ॲपसाठी ‘अँड्रॉईड १२’ अट

जनगणना ॲपसाठी ‘अँड्रॉईड १२’ अट
Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २८ : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिक्षकांचे प्रशिक्षण वेगाने सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल ॲपसाठी किमान ॲण्ड्रॉईड १२ ही अट अनिवार्य करण्यात आली आहे. परिणामी, अनेक शिक्षकांचे विद्यमान मोबाईल अनुपयोगी ठरत असून, नव्याने खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने शिक्षक अडचणीत सापडले आहेत.
‘बीवायओडी’ धोरणांतर्गत सरकारकडून कोणतीही साधनसामग्री न देता शिक्षकांनी स्वतःच्या मोबाईलवरच जनगणनेचे काम करावे, अशी अपेक्षा ठेवली आहे. त्यामुळे सरकारची जबाबदारी शिक्षकांवर ढकलली जात असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्यासह शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या प्रशिक्षणात जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांना समजावून सांगितली जात आहे. प्रत्येक शिक्षकाला ठराविक क्षेत्र देण्यात येणार असून, उन्हाळी सुटीत गावोगावी जाऊन घराघरांतून माहिती संकलन करावे लागणार आहे. ही प्रक्रिया १५ मे ते १६ जूनदरम्यान राबवली जाणार आहे.
या सर्वेक्षणात कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर आणि निवासस्थिती यांसह विविध माहिती मोबाईल ॲपमध्ये नोंदवावी लागणार आहे. तसेच प्रत्येक घराचे जीपीएस लोकेशन, घराचा प्रकार, पाणी, वीज, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची माहिती अपलोड करावी लागणार आहे. काही ठिकाणी घरांचे फोटो अपलोड करण्याच्या सूचनाही दिल्याची माहिती शिक्षकांनी दिली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाईलची क्षमता आणि अद्ययावत सॉफ्टवेअर आवश्यक असल्याने नवीन मोबाईल घेण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त ताण आला आहे.

नाराजी वाढली
जनगणना हे सरकारचे राष्ट्रीय काम असताना खर्च मात्र शिक्षकांनी का करावा? असा संतप्त सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षकांकडे अद्ययावत मोबाईल नसल्याने नव्याने अँड्रॉईड १२ मॉडेल खरेदी करावे लागत असलनयाने आर्थिक ताण वाढला आहे. आवश्यक साधनसामग्री न देता सर्व जबाबदारी शिक्षकांवर सोपवली जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे प्रशिक्षणातील शिक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com