

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ : शहराची जीवनवाहिनी असलेल्या मोरबे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. सध्या धरणात केवळ २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असून, शहराची दैनंदिन मागणीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, परिस्थिती न सुधारल्यास लवकरच अधिकृत पाणीकपात लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याचा पाणीसाठा ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच आहे. मोरबे धरणाची एकूण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर असून, सध्या त्यात केवळ ८२.५५७ साठा आहे. यातील राखीव आणि तांत्रिक साठा वजा करता प्रत्यक्षात २७.२२ टक्के पाणीच वापरासाठी उपलब्ध आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. दरवर्षी साधारणपणे १०.६८ पाणी बाष्पीभवनामुळे नष्ट होते. दुसरीकडे नवी मुंबई महापालिका दररोज ४५० ते ४८५ दशलक्ष लिटर पाणीउपसा करीत असून, त्यातील ५८ पाणी सिडकोच्या खारघर आणि कामोठे नोड्सला पुरवले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि सिडकोच्या वाढत्या मागणीमुळे मोरबे धरणावरील ताण अधिकच वाढत चालला आहे.
मॉन्सून लांबणीवर पडण्याची शक्यता
हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने ७ ऑगस्टपर्यंतचा हा साठा ऑगस्टअखेरपर्यंत खेचून नेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. यासाठीच पालिकेने आतापासूनच सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.
कारवाईचा इशारा
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुण्यासाठी, अंगण झाडण्यासाठी किंवा बांधकामासाठी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी वाया घालवणाऱ्या सोसायट्यांवर आणि व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
धरणातील गाळ कधी काढणार?
- नॅटकनेक्ट फाउंडेशनला माहिती अधिकारानुसार मिळालेल्या माहितीनुसार, धरण पालिकेकडे आल्यानंतर एकदाही गाळ काढण्याचे काम झालेले नाही. हे धरण २०५५पर्यंत नवी मुंबईची पिण्याच्या पाण्याची गरज भागवेल, असा दावा आहे. गाळ न काढल्यास मात्र हा अंदाज फोल ठरू शकतो, असे फाउंडेशनचे संस्थापक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
- कागदोपत्री धरण निरोगी दिसू शकते, पण प्रत्यक्ष उपयुक्त पाणीसाठा दरवर्षी कमी होत जातो, असे कुमार म्हणाले. दरम्यान, यंदा पाऊस सरासरीच्या ९२ ते ९४ टक्के राहू शकतो, असा हवामान अंदाज असल्याने मोरबे परिसरात धरण पूर्ण भरण्याइतका पाऊस न पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मोरबे धरणातील पाण्याची आकडेवारी
घटक सद्य:स्थिती
उपयुक्त जलसाठा २६ % - २७ %
एकूण जलसाठा ८२.५५७
दैनिक उपसा ४५० ते ४८५
सिडकोचा वाटा ५८
कमाल पातळी ८८ मीटर
१. जलसाठा तुलनात्मक तक्ता (एप्रिलअखेर)
२०२३ : ९७%
२०२४ : ८५%
२०२५ : ५०%
२०२६ : २६%
पाणी वापराचे वितरण :
घरगुती वापर : ८५%
सिडको पुरवठा : १२%
गार्डन्स आणि देखभाल: ३%
नागरिकांनी पाण्याचे जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच पाण्याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणाऱ्या रहिवासी सोसायट्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
- अरविंद शिंदे, सहशहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.