

दिघावासीयांना ‘नावाने’ मालमत्ता कर देयके मिळणे कठीण
सिडको-महापालिकेच्या तांत्रिक पेचात रहिवासी हवालदिल
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दिघा परिसरातील हजारो रहिवाशांना मालमत्ता कराच्या देयकांवर स्वतःचे नाव लावण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिघा येथील इमारतींवरील मालमत्ता कराची देयके वैयक्तिक नावाने देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका गौरी आंग्रे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाची सूचना सादर केली आहे. महापालिका मात्र कायदेशीर तांत्रिक बाबींचे बोट धरत सध्यातरी रहिवाशांची ही मागणी फेटाळून लावण्याच्या विचारात आहे.
दिघा परिसरातील बहुतांश इमारती या सिडको किंवा एमआयडीसीच्या जमिनीवर उभ्या आहेत. यातील अनेक इमारती या बेकायदा ठरवल्या आहेत. मात्र, या इमारतींकडून पालिका नियमितपणे मालमत्ता कर वसूल करते. सध्या ही देयके अनेक ठिकाणी वैयक्तिक सदनिकाधारकाच्या नावाने न येता एकत्रित किंवा जुन्या नोंदीनुसार येतात. आपल्या हक्काच्या घराच्या कराच्या पावतीवर आपले नाव असावे, जेणेकरून तो एक ओळखीचा आणि वास्तव्याचा पुरावा ठरेल, अशी रहिवाशांची भावना आहे. नगरसेविका गौरी आंग्रे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाची सूचना सादर केली आहे. रहिवासी नियमित कर भरत असताना त्यांना त्यांच्या नावाने पावती का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधा हव्या असतील किंवा शासकीय कामात पुराव्याची गरज असेल, तर ही नावे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकिकडे महापालिका शास्तीसह कर वसूल करते. मात्र, पावतीवर नाव लावायला टाळाटाळ करते, यामुळे दिघावासीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जर आमचे घर बेकायदा आहे, तर आमच्याकडून कर का घेतला जातो? आणि जर कर घेता, तर आमची नावे का लावली जात नाहीत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या कायदेशीर पेचामुळे दिघा येथील हजारो कुटुंबे सध्या त्रिशंकू अवस्थेत असून, यावर राज्य सरकार काही विशेष धोरण आखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेची तांत्रिक अडचण
महापालिकेने या मागणीवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
नोंदणीकृत दस्तऐवजांचा अभाव : मालमत्ता कराच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी किंवा नवीन नाव लावण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत दस्त असणे अनिवार्य आहे.
बेकायदा इमारतींचे शिक्कामोर्तब : दिघा येथील बहुतांश इमारतींवर बेकायदा बांधकामाचा शिक्का आहे. नियमानुसार, अशा इमारतींमधील घरांची अधिकृत खरेदी-विक्री नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात झालेली नाही.
कायदेशीर पेच : जर मालमत्ता अधिकृत नसेल, तर त्याचे दस्त उपलब्ध होत नाहीत. दस्तऐवज नसल्यामुळे महापालिका प्रशासन कर देयकावर अनधिकृत सदनिकाधारकाचे नाव चढवू शकत नाही.
दिघा मालमत्ता कर सद्यःस्थिती
मुद्दे सद्यःस्थिती
जमिनीचा प्रकार सिडको / एमआयडीसी / गावठाण
इमारतींची स्थिती बहुतांश अनधिकृत किंवा न्यायालयीन प्रक्रियेत
कर आकारणी दंडात्मक किंवा नियमित मालमत्ता कर (शास्तीसह)
मुख्य अडथळा दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्रीच्या नोंदी नसणे
दिघावासीयांकडून नियमांचे पालन नाही
आम्ही केवळ नियमांचे पालन करत आहोत. मालमत्तेच्या मालकी हक्काचा अधिकृत पुरावा (नोंदणीकृत दस्त) सादर केल्याशिवाय मालमत्ता कर देयकात नाव बदलणे किंवा नवीन नाव लावणे प्रशासकीयदृष्ट्या शक्य नाही. दिघा येथील अनेक इमारतींच्या बाबतीत हे दस्त उपलब्ध नाहीत, अशी बाजू नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.