

हरवलेली रोकड एका तासात शोधली
सीसीटीव्हीच्या मदतीने अंबोली पोलिसांची जलद कारवाई
जोगेश्वरी, ता. ६ (बातमीदार) ः अंधेरी पश्चिमेतील अंबोली पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची आणि प्रामाणिकतेची प्रचीती देत ज्येष्ठ नागरिकाची हरवलेली दोन लाख ३८ हजारांची रोकड अवघ्या एका तासात शोधून काढली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
६८ वर्षीय सुभाष सुंदर शेट्टी हे मंगळवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता अंधेरी (पश्चिम) येथील अपना बाजार येथे रिक्षामधून उतरले. या वेळी घाईगडबडीत त्यांची २.३८ लाखांची रोकड असलेली बॅग रिक्षामध्येच राहिली. रिक्षा निघून गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने अंबोली पोलिस ठाणे गाठले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद कोकाटे आणि पोलिस निरीक्षक सारिका खैरनार यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार बिट मार्शल-२ चे पोलिस शिपाई अमित जाधव, पोलिस शिपाई बोराडे यांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. काही मिनिटांतच संबंधित रिक्षाचा क्रमांक शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.
रिक्षाची तपासणी केली असता रोकड असलेली बॅग सुरक्षित अवस्थेत आढळून आली. अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी ही संपूर्ण रक्कम शेट्टी यांच्या स्वाधीन केली. तांत्रिक तपास आणि सतर्कतेच्या जोरावर केलेली ही जलद कारवाई नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल वरिष्ठ स्तरावरून संबंधित पथकाचे अभिनंदन करण्यात येत असून, अंबोली पोलिसांच्या या कार्यामुळे मुंबई पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.