

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला नॉर्वेची साथ
३१ जलमार्ग, ४५ टर्मिनल आणि अत्याधुनिक बोटींची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक ताणाला पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला आता वेग मिळाला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित सागरी तंत्रज्ञान कंपनी ‘मे. हायके एएस’ यांच्यात गुरुवारी (ता. ७) सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला असून, आधुनिक जलवाहतुकीच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कराराअंतर्गत मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जलयाने उपलब्ध करून देणे, तसेच महाराष्ट्रात जहाजबांधणी सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आराखडा तयार झाला असून, आता आधुनिक आणि शाश्वत नौकांची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईसारख्या महानगरात जलमार्गांचा प्रभावी वापर झाल्यास रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. आगामी काळात देशभरात शाश्वत जलवाहतुकीची मागणी वाढणार असून, मुंबईतील ही संकल्पना इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, प्रमुख सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., नॉर्वेच्या मानद कॉन्सुल जनरल मोनिका नागेलगार्ड, स्वीडनचे कॉन्सुल जनरल स्वेन ऑस्टरबर्ग तसेच ‘हायके एएस’चे अध्यक्ष चार्ल्स पेम्ब्रोक बिर्स उपस्थित होते.
२१ विद्यमान जलमार्गांचे उन्नतीकरण
एमएमआरमधील प्रवासी जलवाहतुकीसाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांच्या माध्यमातून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, सध्या कार्यरत असलेल्या २१ जलमार्गांवरील २४ टर्मिनलचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. तसेच नव्याने प्रस्तावित १० जलमार्गांसाठी २१ नवीन टर्मिनल उभारण्याची योजना आहे.
जहाजबांधणी सुविधांवर भर
नॉर्वेची ‘हायके एएस’ कंपनी शहरी जलवाहतुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जलयानांच्या डिझाइन आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबई वॉटर मेट्रोसाठी अत्याधुनिक जलयाने उपलब्ध करून देण्यासोबतच महाराष्ट्रात जहाजबांधणी सुविधा उभारण्यासही कंपनीने उत्सुकता दर्शवली आहे.
मुंबईत जलमार्गांचा प्रभावी वापर झाल्यास रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प हा राज्याच्या सागरी विकासासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीसोबत झालेला हा करार महाराष्ट्रातील बंदर विकास, जहाजबांधणी आणि सागरी कौशल्यविकासाला नवी दिशा देणारा ठरेल.
- नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
३१ जलमार्गांवर सेवा, २१ सध्याचे मार्ग, १० नवीन मार्ग, ४५ टर्मिनलची तयारी, २४ टर्मिनलचे नूतनीकरण, २१ नवीन टर्मिनल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.