उलवे-करंजाडे समावेशनाचा निर्णय लवकरच?

उलवे-करंजाडे समावेशनाचा निर्णय लवकरच?
Published on

उलवे-करंजाडे समावेशनाचा निर्णय लवकरच?
मुख्यमंत्र्यांच्या उलवे दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १२ (बातमीदार) ः उलवे आणि करंजाडे या सिडको विकसित नोड्सचा पनवेल महापालिकेत समावेश करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आणि नव्या शैक्षणिक संकुलाच्या उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. १३) उलवे दौऱ्यावर आहेत. या वेळी मुख्यमंत्री या समावेशाबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर नवीन पनवेल, कळंबोलीसह प्रमुख सिडको नोडचा समावेश करण्यात आला होता. आता त्याच धर्तीवर उलवे आणि करंजाडे या दोन्ही नोडचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. उलवे, करंजाडे, खारघर नोडमध्ये मोठ्या प्रमाणात निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत. हजारो कोटींची गुंतवणूक होत असून, या भागातील जमीनमूल्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरी गरजा लक्षात घेऊन एकात्मिक प्रशासनाची आवश्यकता तीव्र झाली आहे. याबाबत आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. समावेशनासाठी आवश्यक कागदपत्रे, महसुली प्रक्रिया आणि प्रशासकीय मंजुरी यावर सध्या काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे बोलले जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आशावादाचे वातावरण आहे.

वसाहतीतील पाणीप्रश्न गंभीर
सिडको वसाहतींमध्ये नागरिकांना सध्या अनेक नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाई हा त्यातील सर्वात गंभीर प्रश्न आहे, तर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी नवी मुंबईचे पाणी रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित असलेल्या मंचावर हा प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

विमानतळ नामाकरणाचा मुद्दा!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दाही पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊ शकतो.

इतर वसाहतींप्रमाणे करंजाडे उलवे हे नोड महापालिकेच्या अखत्यारीत गेल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी पायाभूत सुविधा मिळतील. आम्ही महापालिकेमध्ये समाविष्ट व्हावेत, अशी दोन्ही वसाहतीतील रहिवाशांची सुप्त इच्छा आहे. पनवेल-उरणचे दोन्ही आमदार यासाठी सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री उलवे या ठिकाणी येत असल्यामुळे साहजिकच आमच्या सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
- वैशाली जगदाळे, संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्था, करंजाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com