

सोने खरेदी टाळू नका!
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोनारांचे सामाजिक माध्यमांवर साकडे
बेलापूर, ता. १२ (बातमीदार) ः परकी चलन वाचवण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ऐन लग्नसराईच्या हंगामात केलेल्या या आवाहनामुळे झवेरी बाजारासह स्थानिक सुवर्ण व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील ज्वेलर्सनी आता ‘सोने खरेदी थांबवू नका’ अशा आशयाचे आवाहन सामाजिक माध्यमातून ग्राहकांना केला आहे.
वाढती महागाई आणि जागतिक युद्धांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशवासियांना सोने खरेदी टाळणे, परदेशी प्रवास टाळणे आणि इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. मे महिना हा लग्नसराई आणि साखरपुड्यांचा काळ असल्याने दागिन्यांना मोठी मागणी असते. मात्र, खुद्द पंतप्रधानांनीच आवाहन केल्यामुळे अनेक नागरिक सोने खरेदीबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. परिणामी, दागिन्यांच्या दुकानांमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. यामुळे लहान-मोठे ज्वेलर्स अडचणीत आले असून, त्यांनी आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. सोने खरेदी टाळू नका, वर्षभरात सोन्याचे भाव वाढले तर काय कराल? किंवा सोने हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे, अशा पोस्ट सध्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर व्हायरल केल्या जात आहेत. सोन्याची गुंतवणूक ही भविष्यातील सुरक्षितता असल्याचे सांगून ग्राहकांना दुकानाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सोने खरेदी का करू नये. जागतिक समस्या समजू शकतो. मात्र, सर्वसामान्यांचे काय? लग्नसोहळे असो अथवा गुंतवणूक सोने हे एक महत्त्वाचे माध्यम आहे.
- गणेश जगताप, न्यू श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स, नेरूळ