ठाण्यात रविवारी बाल हृदयविकारांवर जनजागृती

ठाण्यात रविवारी बाल हृदयविकारांवर जनजागृती
Published on

ठाणे, ता. १३ : बालकांमधील हृदयविकार, जन्मजात हृदयदोष तसेच गर्भातील शिशूंच्या हृदयविकारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक बोधप्रद, सामाजिक बांधिलकी जपणारा आणि संपूर्ण विनामूल्य कार्यक्रम रविवारी (ता. १७) सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील सहयोग मंदिर हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामांकित हृदयविकार तज्ञ डॉ. दयानंद कुम्बला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बाल हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीनिवास लक्ष्मी वेंकटेश, तसेच बालरोग व गर्भातील बाल हृदयरोग तज्ञ डॉ. सोनिया करापूरकर यांची प्रमुख व्याख्याने होणार आहेत. नवजात बाळांचे पालक, तरुण आई-वडील तसेच आजी-आजोबांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून बालकांच्या आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात बाल हृदयरोग, शिशू हृदयरोग चिकित्सा व उपचार, जन्मजात हृदयविकारांची तपासणी आणि उपचार, तसेच गर्भातील शिशूला हृदयविकार असल्यास त्याचे निदान व उपचार या विषयांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. व्याख्यानानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन व प्रश्नोत्तरांचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

अनुभवी डॉक्टर
डॉ. श्रीनिवास लक्ष्मी वेंकटेश हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रमुख सल्लागार व बाल हृदयरोग तज्ञ असून त्यांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका तसेच मुंबई, ठाणे, बंगळुरू, केरळ आणि जयपूर येथील नामांकित संस्थांमध्ये सेवा दिली आहे. नवजात बालकांवरील अतिशय गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया भारतात प्रथमच करण्याचे श्रेय त्यांना जाते. आतापर्यंत त्यांनी सहा हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर डॉ. सोनिया करापूरकर या राष्ट्रीय कीर्तीच्या सल्लागार बालरोग व गर्भातील बाळाच्या हृदयरोग तज्ञ असून बालरोग क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com