

नवी मुंबईकरांचा ‘डिजिटल’ प्रतिसाद
अडीच लाखांहून अधिक नागरिकांची चॅटबॉटला पसंती
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर फक्त एका टचवर सुविधा मिळावी याकरिता नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या चॅटबॉटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सुविधा सुरू केल्यापासून अवघ्या पाच महिन्यांत तब्बल दोन लाख ८९ हजार ४३० लोकांनी प्रतिसाद दिला आहे.
जानेवारी २०२६ला महापालिकेने चॅटबॉटची सुविधा सुरू केली. ८२९१९२०५०४ या क्रमांकावरील व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा लाभ पालिकेशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील नागरिकांना पालिकेशी संबंधित कामांसाठी कोणत्याही महापालिका कार्यालयात प्रत्यक्ष जावे न लागता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याकडे भर दिला जात आहे. यानुसार सरकारने अधिसूचित केलेल्या ६८ लोकसेवांसह आणखी ४५ सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून बांधकाम परवानगी प्रमाणपत्र अशा विविध ११३ सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामधील एक महत्त्वाची सुविधा म्हणजे व्हॉट्सॲप चॅटबॉट असून, आजच्या डिजिटल युगात नागरिकांशी जोडणारे हे एक अत्यंत प्रभावी व स्वयंचलित माध्यम आहे. नवी मुंबई महापालिकेने व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे विविध सेवा एकात्मिक स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. मालमत्ता कर देयके ऑनलाइन उपलब्ध करून देणे व देयक रक्कम भरणा करणे, पाणीपट्टी देयके ऑनलाइन उपलब्ध करून देणे व देयक रक्कम भरणा करणे, समाज विकास विभागाच्या ५० हून अधिक लोककल्याणकारी योजनांकरिता एआय सहाय्यक म्हणून सेवा देणे, सर्व लोकसेवांचे अर्ज व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देणे, मराठीसह इंग्रजी भाषेचा पर्याय असणे अशा विविध सुविधांचा समावेश आहे.
महापालिकेकडून प्रभावी वापर
नवी मुंबई महापालिकेने व्हॉट्सॲप चॅटबॉटव्दारे तीन लाखांहून अधिक नागरिकांना मालमत्ता कर भरल्याची सूचना त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर देण्यात आलेली आहे. अभय योजनेचे संदेशही एक लाखाहून अधिक मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना पाठविण्यात आलेले आहेत. एक लाखाहून अधिक नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षणविषयक अभिप्राय नोंदविण्यासाठी आवाहन करणारे संदेश देण्यात आलेले आहेत. सद्यःस्थितीत एक लाखाहून अधिक नागरिकांना जनगणना २०२७ मध्ये सहभागी होण्यासाठी संदेश पाठविण्यात आलेले आहेत.
१० कोटींचा मालमत्ता कर जमा
मार्च २०२६ मध्ये व्हॉट्सॲपव्दारे पाठविलेल्या संदेशाचा वापर करून साधारणत: १० कोटी इतका मालमत्ता कर जमा झालेला आहे. विशेष म्हणजे यासाठी आलेला संदेश प्रसारण खर्च केवळ ६० रुपये हजार इतकाच आहे. ७ ते ८ हजार वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲप पेमेंट लिंकव्दारे देयक रक्कम भरणा केलेली आहे. या व्यतिरिक्त एक लाखाहून अधिक नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यास मदत मिळविण्यासाठी व्हॉट्सॲपचा सक्रिय वापर केलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.